धारूर-: तालुक्यातील कासारी बोडखा येथील मायलेकी ओढ्याला आलेल्या पुरात वाहून गेल्या. या घटनेत एक 17 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला तर आई आश्चर्यकारक रित्या वाचल्याची घटना सोमवार 12 जुलै रोजी रात्री सात वाजता घडली.
पुष्पा बालाजी तिडके वय 17 वर्ष मयत मुलीचं नाव असून 12 जुलै रोजी सायंकाळी सात वाजता शेतातून आपल्या आई मुक्ताबाई बालाजी तिडके (वय 35 वर्ष) सोबत घरी येत असताना पावसामुळे ओढ्याला पूर आला होता या पुरात मायलेकी दोघीही वाहून गेल्या.
आईही जवळपास शंभर फूट वाहत असताना एका झाडाच्या फांदीला आधार घेत ओढ्यातून बाहेर येत आश्चर्यजनक रित्या वाचली तर नवतरुणी जवळपास तीन किलोमीटर अंतरावर वाहत गेली यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती तिडके कुटुंबांनी दिली.
सदरील घटनेची माहिती ग्रामस्थांनी दिंद्रुड पोलिसांना दिली असता पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनासाठी धारूर येथील शासकीय रुग्णालयात पाठवले. मयत तरुणीवर सायंकाळी बोडका येथे अंत्यविधी करण्यात आला.
दरम्यान धारूर तहसीलच्या तहसीलदार श्रीमती वंदना शिडोळकर यांनी पीडित कुटुंबाची बुधवारी भेट घेतली. झालेली घटना दुर्दैवी असून यासंदर्भात जिल्हाधिकारी साहेबांकडे अहवाल पाठवला आहे व पीडित कुटुंबाला चार लाख रुपयांची मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे तहसीलदार वंदना शिडोळकर यांनी सांगितले. या घटनेत दिंद्रुड पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .अशी माहिती दिंद्रुड पोलीस ठाण्याचे फौजदार विठ्ठल शिंदे यांनी दिली.
0 टिप्पण्या