Subscribe Us

header ads

कोरोनामुळे एकल झालेल्या महिलांना आधार देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध : अॅड.यशोमती ठाकूर



मुंबई-:  राज्यात कोरोना संसर्गामुळे विधवा झालेल्या एकल महिलांचे प्रश्न गंभीर आहेत. या महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी महिला व बालकल्याण विभाग लवकरच सकारात्मक निर्णय घेईल. या महिलांना आधार देण्याची भूमिका महाराष्ट्र सरकार घेईल असे महिला व बालकल्याण मंत्री अॅड.यशोमती ठाकूर यांनी सांगितले. कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती च्या सर्व सदस्यांशी त्यांनी झूम मीटिंग घेऊन चर्चा केली. यावेळी त्या बोलत होत्या. महाराष्ट्रातील १५० संस्थानी एकत्र येऊन कोरोना संसर्गामुळे विधवा झालेल्या महिलांच्या प्रश्नासाठी नेटवर्क स्थापन केले आहे. या नेटवर्कचे महाराष्ट्र राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी साहेब असुन महाराष्ट्राच्या २२ जिल्ह्यातून १९५ सदस्य या बैठकीत सामील झाले होते. श्रीमती आय ए कुंदन, प्रधान सचिव महिला व बाल विकास विभाग मुंबई , आयुक्त श्री राहुल मोरे ,उपायुक्त  दिलीप हिवराळे उपसचिव श्री वरुडकर, जॉइंट सेक्रेटरी श्री अहिरे उपस्थित होते. 

        सुरूवातीला या एकल महिला पुनर्वसन समितीचे महाराष्ट्र राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांनी कोरोनाने २०,००० पेक्षा जास्त महिला विधवा झाल्या आहेत. या महिला हॉस्पिटलच्या बिलामुळे कर्जबाजारी झाल्या आहेत. तेव्हा शासनाने या महिलांना एक रक्कमी आर्थिक मदत करावी. राजस्थान,आसाम,केरळ,बिहार,आसाम या राज्यांनी जशी आर्थिक मदत दिली आहे तशीच या महिलांना पण द्यावी. या महिलांना पेन्शन देण्याची गरज आहे व या महिलांचे प्रश्न गंभीर असल्याने राज्यातील स्वयंसेवी संस्था व शासन यांनी एकत्र काम करावे अशी भावना व्यक्त केली.
या समितीचे ज्येष्ठ सदस्य मकाम व उगम संस्थेचे जयाजी पाईकराव(हिंगोली) यांनी या महिलांची संख्या नक्की करण्यासाठी शासनाने गावपातळीवर सर्वेक्षण करावे जिल्हा पातळीपासून तालुका पातळीपर्यंत स्वयंसेवी संस्थांना घेऊन समित्या निर्माण केल्या तर या कामाला गती येईल असे सांगितले.
मंडलिक ट्रस्ट संस्थेचे अल्लाउद्दीन शेख(पनवेल) यांनी रेशनच्या अंत्योदय मध्ये या महिलांचा समावेश करावा व 15 व्या वित्त आयोगातून या महिलांसाठी मदत करणे कसे शक्य आहे हे तपशीलवार पटवून दिले. निर्माण संस्थेचे वैशाली भांडवलकर(पुणे) यांनी वेगवेगळ्या शासकीय योजना या महिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाने काय करायला हवे याची मांडणी केली व योजनांची पुस्तिका प्रसिद्ध करण्याची सूचना केली. आधार बहुउद्देशीय संस्थेच्या विद्या कसबे(नांदगाव) यांनी संजय गांधी निराधार योजनेतील अडचणी मांडल्या.२१००० उत्पन्नाची अट ही हास्यास्पद असून ती बदलण्याची गरज आहे व सर्व योजनांमध्ये या एकल महिलांना प्राधान्यक्रम देण्याची मागणी त्यांनी केली . चेतना महिला विकास संस्थेच्या असुंता पारधे(पुणे) यांनी या महिलांचे घर शेत व मालमत्तेवरील हक्क शाबूत राखण्यासाठी सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात याबाबत नेमक्या सूचना केल्या. नवचेतना स्वयंरोजगार संस्थेचे प्रशांत पाटील(नाशिक) यांनी रोजगार निर्मितीच्या पुढाकाराने महिला स्वयंपूर्ण होतील त्यासाठी या महिलांना महिला आर्थिक विकास महामंडळाच्या मदतीने शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून द्यावे व छोटे छोटे कोर्सेस सुरू करावेत अशी सूचना केली. बालकल्याण समितीच्या सविता कुलकर्णी(लातूर) यांनी बालसंगोपन योजनेतील अडचणी सांगून त्याची प्रभावी अंमलबजावणी कशी करता येईल ? याबाबत अनेक महत्त्वाच्या सूचना केल्या. या बैठकीस बीड जिल्ह्यातील समन्वयक संस्था श्री तुळजाभवानी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जोला ता केज सहभागी होऊन या महिलांच्या बाबतीत येणाऱ्या विविध समस्या या बाबतीत अडचणी ची माहिती एकत्र करून ती राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांना देण्यात आली.

या सर्व सूचनाबाबत महिला बालकल्याण विभागाच्या सचिव कुंदन यांनी या महिलांच्या प्रश्नाबाबत महिला बालकल्याण विभाग तातडीने योग्य निर्णय घेईल असे सांगून जिल्हा स्तरावर असलेल्या टास्क फोर्स ची कक्षा रुंदावण्याची भूमिका घेतली जाईल व मुलांसाठी काम करणारा टास्क फोर्स इथून पुढे महिलांसाठीही काम करेल असे सांगून  स्वयंसेवी संस्थांनी केलेल्या सर्वच सूचना महत्वाच्या असून त्या प्रत्येक सूचनेची दखल घेतली जाईल असे सांगितले.इतर राज्यांच्या योजनांचा अभ्यास केला जाईल. महिला बाल विकास विभागाचे आयुक्त राहुल मोरे यांनी इतर विभागांशी संबंधित असलेल्या सूचनाबाबत त्या विभागांशी चर्चा केली जाईल व टास्क फोर्सच्या माध्यमातून या महिलांचे प्रश्न जिल्हास्तरावर सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील. स्वयंसेवी संस्थांनी अत्यंत नेमकेपणाने सूचना केल्याबद्दल त्यांनी स्वयंसेवी संस्थांचे कौतुक केले. या बैठकीस बीड जिल्ह्यातील शांतीवन आर्वी,  श्री तुळजाभवानी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जोला ता केज, सरस्वती सेवाभावी संस्था , संत सावता महाराज सेवाभावी संस्था , संत गाडगे महाराज सेवाभावी संस्था यासह अनेक सामाजिक संस्था सहभागी झाल्या होत्या. या बैठकीचे सूत्रसंचालन बालकल्याण विभागाचे उपायुक्त दिलीप हिवराळे यांनी केले. यावेळी बीड जिल्ह्यातुन कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती चे जिल्हा समन्वयक बाजीराव ढाकणे , प्रल्हाद कुंटे, सुरेश गांजुरे, अशोक मुंडे, पंचफुला ओव्हाळ, भगवंत पाळवदे, कुंभारकर , संदिप बहिर यांच्या सह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा