Subscribe Us

header ads

बीडकरांची मदत पोहोचली पुरग्रस्तांना!तुम्ही-आम्ही बीडकरांची माणुसकी दरड कोसळून विस्थापित झालेल्यांना मिळाला दिलासा

बीड प्रतिनिधी-: दि. 2 : कुठल्याही आपत्तीमध्ये आपदग्रस्तांच्या मदतीसाठी धावून जाण्याची संवेदनशिलता चिपळूणच्या महापुरावेळीही राज्याने अनुभवली. मागील चार दिवसांपुर्वी बीडवासियांनी ‘तुम्ही-आम्ही बीडकर’ या नावाखाली जमा केलेली 10 टन धान्य व इतर संसारोपयोगी वस्तुंची मदत रविवारी (दि.1 ऑगस्ट) रोजी आपदग्रस्तांकडे सुपूर्द केली. मदत स्विकारताना आपदग्रस्तांचे डोळे अश्रुंनी डबडबून गेले होते. महापूर आणि दरड कोसळल्याने त्यातील अनेकांनी आपल्या जवळच्या आप्तेष्टांना गमावलेले होते. या संकटसमयी इतक्या लांबून बीडकरांनी जी मदत तळमळीने आमच्यापर्यंत पोहोच केली ती पाहता बीडकरच आता आमचे जवळचे आप्तेष्ट झाल्याची भावना आपदग्रस्तांसाठी समन्वयकाचे काम करणारे तेथील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप यादव यांनी व्यक्त केली.

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात कोंडावळे गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत गावाने अनेकांना गमावलेले होते. या गावचे तात्पुरते निवारागृह मीरगाव येथील कोयना शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये करण्यात आले होते. तर सातारा जिल्ह्यातीलच मानाईनगर येथे कोसळलेल्या दरडीमुळे तेथील नागरिकांचे तात्पुरते निवारागृह कोयनानगर येथील शाळेत करण्यात आले होते. या दोन्ही ठिकाणी बीडकरांनी पाठवलेले किराणा साहित्य, ब्लँकेट, कपडे, साड्या, चप्पल आदी वस्तु आपदग्रस्तांना वाटप केल्या. तर कोयना नगर येथे अंबाजोगाईच्या तानाजी जाधव यांच्या टायगर ग्रुपतर्फे आयोजित अन्नदानाच्या उपक्रमाला देखील किराणा साहित्य देण्यात आले. मानाई नगर या गावचे पुनर्वसन होईपर्यंत किमान दोन ते तीन महिने लागतील तोपर्यंत हा अन्नदान कार्यक्रम तिथे चालणार आहे.

त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे कोळकेवाडी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे आणि ढगफुटीने वशिष्ठी नदीला पाणी आल्याने फुगवटा तयार होऊन संपूर्ण शहरात 25 फूट इतके पाणी साचले होते. त्यामुळे शहरासह आजुबाजुचा अनेक ग्रामीण भाग उध्वस्त झालेला होता. चिपळून शहराजवळील कळंबेस्ती भागाचे सरपंच सचिन शेटे यांच्या मार्गदर्शनात या गावात आपदग्रस्तांना किराणा साहित्य, ब्लँकेट, चप्पल, व इतर वस्त्रांची मदत करण्यात आली. त्यानंतर उर्वरित साहित्य चिपळून शहरात मदत कार्य करणार्या नाम फाऊंडेशनकडे सुपूर्द करण्यात आली. संपूर्ण मदत  कार्य जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष संतोष सोहनी, जिल्हाध्यक्ष विनोद पिंगळे, वर्धमान खिंवसरा, महेश जाधव, सय्यद अमजद, तसेच मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हा समन्वयक सीए बी.बी.जाधव, सामाजिक कार्यकर्ते प्रभाकरआप्पा कोलंगडे, कार्यारंभचे कार्यकारी संपादक बालाजी मारगुडे यांनी सहभाग नोंदवला.


बीडकर नेहमीच प्रत्येक संकटकाळात आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी धावून जातात. 1993 साली झालेल्या किल्लारीच्या भुकंपापासून ते चिपळूणच्या महापुरापर्यंत बीडकर संकटमोचक म्हणून आपदग्रस्तांना मदत करत आले आहेत. मदतीसाठी धावून जाण्यााची हीच परंपरा आताही कायम आहे. आमच्या आवाहनानंतर बीडकरांनी केलेली मदत योग्य व्यक्तींपर्यंत पोहोच झाली याचं समाधान आहे व सर्वांनी या मदत कार्यात केलेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार.
बी.बी.जाधव
सीए तथा मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हा समन्वयक


संवेदनशील मनाच्या व्यापारी बांधवांनी केलेली मदत योग्य व्यक्तींपर्यंत पोहोच झाली. पुरग्रस्तांच्या चेहर्‍यावर एक अनामिक भिती होती. परंतु आपण केलेल्या मदतीमुळे त्यांच्या चेहर्‍यावर जे स्मित आले त्यातून आत्मीक समाधान मिळाले. कुठल्याही संकट समयी आम्ही नेहमीच मदतीसाठी दोन पावलं पुढे असू.
संतोष सोहनी
कार्याध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ बीड


मदतीसाठी बीडमध्ये यांनी लावला हातभार
व्यापारी असोसिएशन, सुभाष रोड व्यापारी असोसिएशन, आयएमए असोसिएशन, सीए आणि आयटीपी असोसिएशन, योगा ग्रूप, रंकाळा ग्रूप व तसेच बीडमधील प्रतिष्ठीत नागरिकांनी मदत केली. संपूर्ण मदत कार्यक्रमात जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष संतोष सोहनी, जिल्हाध्यक्ष विनोद पिंगळे, वर्धमान खिंवसरा, महेश जाधव, सय्यद अमजद, तसेच मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हा समन्वयक सीए बी.बी.जाधव, सामाजिक कार्यकर्ते प्रभाकरआप्पा कोलंगडे, कार्यारंभचे कार्यकारी संपादक बालाजी मारगुडे यांनी सहभाग नोंदवला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा