Subscribe Us

header ads

RCB vs KKR : कोलकातानं उडवला बंगळुरूचा धुव्वा; ९ गड्यांनी दिली मात

इंडियन प्रीमियर लीग २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची सुरुवात निराशाजनक झाली आहे. कोलकाता नाइट रायडर्सने या सामन्यात विराटसेनेला ९ गड्यांनी सहज मात दिली. आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र विराटचा हा निर्णय पूर्णपणे फसला. बंगळुरूचे फलंदाज अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले आणि संघ ९२ धावांवर सर्वबाद झाला. देवदत्त पडिक्कलने २२ धावांची संघासाठी सर्वोत्तम खेळी केली. प्रत्युत्तरात कोलकाताचे सलामीवीर शुबमन गिल आणि पदार्पणवीर व्यंकटेश अय्यर यांनी ८२ धावांची दमदार सलामी दिली. १३ धावांत ३ बळी घेणारा कोलकाताचा फिरकीपटू वरुण चक्रवर्तीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.


कोलकाताचा डाव

बंगळुरूच्या छोटेखानी धावसंख्येचा पाठलाग करताना शुबमन गिल आणि पदार्पणवीर व्यंकटेश अय्यर यांनी आक्रमक सुरुवात केली. या दोघांनी सहाव्या षटकातच संघाचे अर्धशतक फलकावर लावले. त्यानंतर अर्धशतकाला दोन धावा बाकी असताना यजुर्वेंद्र चहलने शुबमनला झेलबाद केले. शुबमनने ६ चौकार आणि एका षटकारासह ४८ धावा केल्या. तर अय्यर २७ चेंडूत ७ चौकार आणि एका षटकारासह ४१ धावांवर नाबाद राहिला. कोलकाताने १० षटक राखून बंगळुरूचे आव्हान पूर्ण केले.

बंगळुरूचा डाव

कर्णधार विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांनी सलामी दिली, पण कोलकात्याचा वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाने विराटला वैयक्तिक ५ धावांवर पायचित पकडत बंगळुरूला पहिला धक्का दिला. त्यानंतर पडिक्कलने केएस भरतसोबत छोटेखानी भागीदारी रचली. पण पडिक्कल बाद झाल्यानंतर संघाला उतरती कळा लागली. डिव्हिलियर्स, मॅक्सवेल हे स्टार फलंदाजही काही करू शकले नाही. आंद्रे रसेल आणि फिरकीपटू वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी ३ तर लॉकी फर्ग्युसनने २ बळी घेत बंगळुरूचा डाव ९२ धावांवर संपुष्टात आणला. रसेलने ९ धावांत ३ तर चक्रवर्तीने १३ धावांत ३ बळी घेतले.

कोलकाता नाइट रायडर्सइयॉन मॉर्गन (कप्तान), नितीश राणा, व्यंकटेश अय्यर, शुबमन गिल, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), आंद्रे रसेल, सुनील नरिन, प्रसिध कृष्णा, वरुण चक्रवर्ती आणि लॉकी फर्ग्युसन.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविराट कोहली (कप्तान), देवदत्त पडिक्कल, केएस भारत, एबी डिव्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेल, वनिंदू हसरंगा, सचिन बेबी, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, काईल जेमिसन आणि यजुर्वेंद्र चहल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा