Subscribe Us

header ads

आनंद जीवनाचा काय करू आता मी ओलांडली चाळीशी शोभती का पोरखेळ लाज वाटते मनाशी काय झाले ओलांडली तुम्ही चाळीशी

बीड स्पीड न्यूज 

आनंद जीवनाचा

          काय करू आता मी
          ओलांडली चाळीशी
          शोभती का पोरखेळ
           लाज वाटते मनाशी
                    काय झाले ओलांडली तुम्ही चाळीशी किंवा पन्नाशी! बालपण थोडेच विसरणार! खेळा मैदानावर मनसोक्त! जणू आहात शाळकरी! वाटतेय खावेसे बर्फाळ गारेगार! रंगवा ओठ आणि जीभ! खाऊन झाले गारेगार की पहा  आरशात आपले लाल-गुलाबी ओठ आणि जीभ! त्यात गुन्हां थोडाच आहे! वाटतात खाव्या चिंचा गाभूळलेल्या पाडून झाडांवर दगड! मग मारा ना खुशाल दगड झाडांवर नि पाडा खाण्यास गाभुळलेल्या  आंबट गोड चिंचा! कैऱ्या, जांभळेही खाऊया रानात जाऊन कचाकच! यासाठी काय लाजायचे!
          वाटते आरशात पाहून करावा नृत्यप्रकार! वाट कसली पाहता? घ्या नाचून मस्त! दुखू द्या शरीराची नस नि नस! येऊ द्या घाम कपाळावर..... मजा तरी येईलच.... वाटतेय भिजावे पावसात... खेळत भिंगोऱ्या नि गात  येरे येरे पावसा अशी पावसाची गाणी!... मग का लाजता? घ्या भिजून पावसात ओलेत्या कपड्यांनी आणि घुसा घरात....खा गरम गरम भजी कॉफीच्या कपासंगे! लहानपणीच भिजण्याचा फक्त काय ठेका घेतलाय काय? कुणी काय म्हणेल हसतील की चिडवतील? नका करू काळजी! जमाना समजा आपलाच! घ्या जीवनाचा आनंद! आयुष्य हे क्षणभंगुर! सुख शोधावे मृगजळावाणी! खेळूया मस्त बागडत, गात रानी पाखरांची गाणी! कुणी म्हणेल वेडा तर कुणी लाडका म्हणु दे काहीही!  दुसऱ्याच्या तोंडावर थोडीच नियंत्रण ठेवता येते! कसेही वागले तरी ते टीकाच करणार! मग कशाला घाबरायचे!
                 वाटते ना, टी-शर्ट आणि हाफ पॅंट घालून बागेत फिरावे, सखीचा हात हातात घेऊन घ्या खुशाल! सुखावेल तुमची सखीही आणि तुमचा मनमयूरही नाचू लागेल! बालपणी खेळलेल्या आट्यापाट्या, लगोऱ्या आठवतात का? खेळा पुन्हा नव्याने!सायकलची स्पर्धा करायचीय? चालवा मग मनसोक्त! नदीत डुंबायचेय? दिवसभर घ्या डुंबून! नदी आपलीच आहे. ती थोडेच नको म्हणणार! अहो जीवनाचा रंग निराळा! टाकून घ्या त्यात नाना रंग! उजळून जातील जीवनाचे रंग! भरतील सुखाच्या राशी तुमच्या नसानसातून! खेळेल बालपणीचे ते रक्त!  नको चिंता पैशाची....तो तरी नश्वर! उद्याच्या काळजीने का आपला आज बिघडून घ्यावा?
          सागरगोटे खेळताना करा जी भर मजा! विटीदांडू, चेंडूफळी खेळण्याची वाटून घेऊ नका सजा! उसळू द्या उर्मी तुमच्यातली पावला पावलासंगे! खो-खो आणि कबड्डीने  
होईल निखळ मनोरंजन तुमचे! तुमच्या अल्लड मनाचे अन्  दुर्मुखलेल्या चेहऱ्याचे!  उत्साह जाऊद्या तुमचा ओसंडून! चेतवू द्या शरीराच्या साऱ्या रक्तवाहिन्या! मग पहा वाटेल तुम्हाला आहात जणू शाळकरी पोर ! धुरवाल्याच्या धुरातून जाऊ असे वाटतेय का? मग पहा जाऊन !जायचेय का झुक झुक आगीनगाडीतून? पळती झाडे, आणि घरे पहात खिडकीतून मस्त!
               येताच थंडीचा ऋतू, पेटवा म्हातारी गोळा करून मोठी ती शेकोटी गप्पा झोडत शेकोटीच्या भवताली! नको कोणी म्हटले? वाटतात ना कधी कधी गुणगुणाव्या शालेय पाठ्यपुस्तकातील बाल कविता! घ्या गुणगुणून मस्त!नातवंडांना चॉकलेट देताना आपणासही त्याचा तुकडा तोडून दातांनी हळूच खावसं वाटतं! यात गैर ते काय! बालपणी आईजवळ हट्ट करून याच ताटात मला जेवायचे आहे असा आत्ताही हट्ट केला तर कुठे बिघडले? वाटतं का, कधी पतंग उडवीत खेळावं मैदानावर मस्त,झुलावं वाऱ्यासंगे रानफुलांसारखे!  फुलपाखरामागे धावावं वाटणं सहाजिकच आहे. मग घ्या धावून रानवाऱ्यांसवे हवे तितके! आपले वय वाढले तरी मन मात्र बालपणीचेच! बालपणीचा जीवनाचा पुन्हा प्रत्यक्ष अनुभव घ्यावासा वाटतो ना! सहाजिकच आहे? कोणाला काय वाटेल याचा विचार करत राहिलो तर अशा बारीकसारीक निखळ आनंदाला मुकावे लागेल. बालपणीचे निर्व्याज प्रेम आणि निष्पाप, निरागस जीवन नव्याने जगावेसे वाटतेय? गैर ते काय! रात्री चांदण्यात फिरावेसे वाटणे तरी मनुष्यधर्मात सहजच असते.
                   क्रीमची बिस्किटे किंवा आईस्क्रीम जीभ बाहेर काढून चाटणे कितीही असंस्कारी वाटले तरी लहान बालके तसेच करून मस्तपैकी आस्वाद घेत असतात. तीच अनुभूती पुन्हा आपणास घ्यावीशी वाटणे यात  नवल ते काय! झालाय जरी डायबीटीस आणि उच्च रक्तदाब! पण पावसात भिजून आल्यावर तळलेली कुरकुरीत भजी किंवा खारे चणे-फुटाणे खावेसे वाटले त्यात आपला काय दोष! खाऊन घ्या वेगवेगळे असे सर्व काही पदार्थ!..... नको मनाला मारायला आणि अतृप्त ठेवायला !संध्याकाळच्या वेळी डोळ्याला गॉगल लावून दोन्ही खिशात दोन हात घालून मोठ्याने शीळ वाजवत बागेत चालावेसे वाटले तर थोडेच टप्पोरी वाटणार! जगावेच मस्त असे बालपणीचे  ते सुंदर आयुष्य! वाटले तरी गावे प्रेमगीत सखीच्या प्रेमात जाऊ डुंबून! घ्यावी प्रेमगीतांची वही हातात नि जावे थेट नदीच्या काठावर! लिहून प्रेमगीत ऐकवावे तिला........
 विमानातून आकाशात फिरताना खिडकीतून कापसासारखे ढग पाहण्याची मजा काही औरच! पहावेत डोळे फाडुन ते शुभ्रधवल कापसी ढग! विमानाच्या खिडकीतून  आकाशातल्या म्हातारीला करावा टाटा! अगदी बालपणी करायचो तस्साच!..... जगावे मुक्त जीवन..... अन् उपभोगावे जीवनाचे  हे अनमोल क्षण! त्या क्षणांच्या पूर्तीसाठी यावे पुन्हा नव्याने हे बालपण!
                   वाटतेय का मित्राला मारावी
हळूच पाठीमागुन टपली आणि लपवुन बसावे.....चिडला जर मित्र तर हळूच लपलेल्या जागेतून बाहेर यावे अन् एप्रिल फूल करत सर्वांनीच खळखळून हसावे!..... मित्रांच्या वाढदिवसाला धुमशान नाचावे....एखादी पेन किंवा पेन्सिल भेट म्हणुन देताना असे वाटावे की खूप किमती भेट देतोय.......एखाद्या मित्राची आई काहीतरी बहाणा करून त्याला खेळायला सोडत नसेल तर " काकू सोडा ना त्याला खेळायला.आमच्या टीमचा कॅप्टन आहे तो.घरी आल्यावर तो सगळा गृहपाठ करील" असे म्हणून मस्काबाजी करण्याचा आनंद तरी अफलातूनच!!  
           पावसाळ्यात गढूळ पाणी भरलेल्या डबक्यातले पाणी पायांनी उडवत चालावे बिनधास्त! नको धास्ती की उडतील गढुळ जलबिंदू दुसऱ्यांच्या कपड्यावर! डाग पडतील त्यांच्या कपड्यांना! अन् ओरडतील ते मनसोक्त!...... नसावी धास्ती कशाची...... मिळवावे  पुनःश्च निरागस, निसटलेले असे हे बालपण! उपभोगावे हे तरूणपण आणि त्याची ती मजा पुन्हा घेण्यात निखळ आनंद मिळत असेल तर जगावे ते बालपण!

सौ‌.भारती सावंत
मुंबई

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा