Subscribe Us

header ads

देशाच्या भविष्यावर चर्चा करण्याची आज गरज आहे- जयदेव डोळे; माणुसकी पेरण्याची आज गरज आहे- दयानंद माने

बीड स्पीड न्यूज 

देशाच्या भविष्यावर चर्चा करण्याची आज गरज आहे- जयदेव डोळे
माणुसकी पेरण्याची आज गरज आहे- दयानंद माने

औरंगाबाद (प्रतिनिधी) मौलाना अबुल कलाम आझाद रिसर्च सेंटर येथे संपन्न झालेल्या एक दिवसीय आंतरविद्याशाखीय आंतरराष्ट्रीय परिषदेत देशाच्या भवितव्यावर चिंतन करण्याची गरज असल्याचे सर्व मान्यवरांनी सांगितले. देशाचे ७५वे वर्ष आपण साजरे करत आहोत या निमित्ताने दि इंग्लिश एज्युकेटर्स सोसायटी अंबाजोगाई आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन राजकीय विश्लेषक तथा ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे यांच्या हस्ते संपन्न झाले. उद्घाटकीय भाषणात ते म्हणाले की, देशाचे सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय आणि साहित्यीक चेहरा मोहरा बदलण्याचे काम एक विशिष्ट वर्ग करत आहे. दुसऱ्या बाजूला देशात अराजकता कशी माजेल, एकमेकांबद्दल द्वेष कसा पसरेल या संदर्भाने काम करणारी एक फळी आज निर्माण झाली आहे, जी देशाच्या हितावह नाही. तेव्हा वाईट मानसिकतेतून काम करणाऱ्यांना आपण वेळीच आवर घातली पाहिजे. सत्ता कोणाचीही असो मात्र देशात सामाजिक समता, बंधुता आणि प्रेम नांदले पाहिजे यावर चर्चा विचार मंथन होणे गरजेचे असल्याचे मत यावेळी जेष्ठ पत्रकार जयदेव डोळे यांनी मांडले. यावेळी विचार मंचावर बीज भाषक डॉ सचिन केतकर, मिलिंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ वैशाली प्रधान व सामाजिक शास्त्राचा डीन चेतना सोनकांबळे, डॉ. बाबसाहेब अंबेडकर विद्यापीठ मॅनेजमेंट कौन्सिल सदस्य डॉ. राजेश करपे, दि इंग्लिश एज्युकेटर्स सोसायटीचे सचिव रमेश लांडगे, डॉ विष्णू पाटील आणि परिषदेचे आयोजक डॉ महेश वाघमारे उपस्थित होते. अध्यक्षीय समारोप करताना देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर अशोक तेजनकर म्हणाले की, आज संशोधन क्षेत्रात कॉलिटीचे संशोधन होणे गरजेचे आहे. एम.फिल., पीएचडी च्या संदर्भाने बोलताना ते म्हणाले की, एका तालुक्या पुरता विषय घेऊन विद्यार्थी संशोधन करत आहेत, ज्यामध्ये केवळ आकडे बदल आणि शब्दाची हेरफार करून डिग्र्या मिळवण्याचे काम सुरू आहे. दि इंग्लिश एज्युकेटर्स सोसायटी सारख्या सामाजिक संस्थेने, महाविद्यालय, विद्यापीठाने प्रयत्न केला तर निश्चित क्वालिटीचे संशोधन होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल. बीज भाषण करताना महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठ बडोदा गुजरातचे डॉ. सचिन केतकर म्हणाले की, देश आणि देशाच्या वर्णनात्मक कक्षा आपण समजून घेतल्या पाहिजेत. देशाच्या स्वातंत्र्य वर्षाच्या 75 वर्षांनंतर आजही भारत देशात ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय, 

सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रात म्हणावी तेवढी प्रगती झाली नाही. याला राजकारण जेवढे जबाबदार आहे तेवढाच इथला माणूस जबाबदार असल्याचे बीजभाषक डॉ. सचिन केतकर म्हणले. आपल्या मध्ये देश प्रेम आहे सोबत आत्मभान आले पाहिजे ज्या मुळे देशाचा खरा इतिहास जगासमोर यायला वेळ लागणार नाही. आज देशा सहित जगात अराजकता मांडली आहे. माणूस माणसापासून दूर होत चालला आहे. त्यामुळे देशाच्या विकासाला धोका निर्माण झाला आहे. आपली प्रगती, विकास थांबला आहे. त्यामुळे सर्व क्षेत्रात सकारात्मक विचार होणे गरजेचे आहे असे ते म्हणाले. 
परिसंवादाच्या निमित्ताने अध्यक्ष म्हणून मिलिंद महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ वैशाली प्रधान डॉ रश्मी अचमारे यांनी सभागृहाला संबोधित केले. यावेळी विचार मंचावर डॉ अजित (कन्याकुमारी), डॉ पृथ्वीराज और (नांदेड) आणि डॉ अजय देशमुख (वैजापूर) उपस्थित होते.  संशोधन पेपर वाचन सत्राचे अध्यक्ष म्हणून संदीप युनिव्हर्सिटी नाशिकच्या मोहिनी गुरव उपस्थित होत्या. त्यांच्या अध्यक्षतेखाली डॉ सुरेश घुमटकर, डॉ दलविर सिंह गाहेलोत यांनी आपल्या संशोधन पेपरचे वाचन केले. यावेळी उत्कृष्ट संशोधन पेपर पुरस्कार बलभीम महाविद्यालयाचे सुरेश वाडकर यांना घोषित  करण्यात आला. या परिषदेला महाराष्ट्र सहित देशभरातून संशोधक विद्यार्थी प्राध्यापकासह बंधू-भगिनी उपस्थित होत्या. 
समारोप सत्रामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक सकाळचे निवासी संपादक मा. दयानंद माने आणि सामाजिक शास्त्राचा डीन डॉ. चेतना सोनकांबळे तर अध्यक्ष म्हणून आनंदराव धोंडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ हरिदास विधाते उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार आणि राष्ट्रीय आदर्श प्रशासन पुरस्कार वितरित करण्यात आला. याप्रसंगी दैनिक सकाळचे संपादक दयानंद माने म्हणाले की, आज माणुसकी पेरण्याची गरज आहे. गल्ली ते दिल्ली पर्यंत आणि दिल्ली ते जग अस्वस्थ आहे. यावेळी सकारात्मक विचारातून आधार आणि प्रेरणा देण्याचे काम चर्चासत्र आणि परिषदा देतात. दि इंग्लिश एज्युकेटर्स सोसायटी सारख्या संस्थेने तालुक्या सह महाराष्ट्रात  केले पाहिजे असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला. या परिषदेचे सूत्रसंचालन डॉ अब्दुल अनिस, प्रास्ताविक डॉ. महेश वाघमारे तर उपस्थितांचे आभार डॉ मोहिनी गुरव यांनी मानले. परिषद यशस्वी करण्यासाठी आयोजक महेश वाघमारे, संयोजक राजेश करपे, डॉ अब्दुल्ला अनिस, डॉ गणेश मोहिते, डॉ मोहिनी गुरुव, डॉ. के च वाघमारे, डॉ हंसराज जाधव, डॉ. देवराज दराडे, डॉ. अर्जुन मोरे, डॉ. कृष्णा आगे, डॉ. शैलेश अक्कुलवर यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा