Subscribe Us

header ads

पोलीस अधिक्षक राजा रामास्वामी तात्काळ सक्तीच्या रजेवर--गृहमंत्री वळसे पाटील यांचे आदेश




बीड स्पीड न्यूज 



पोलीस अधिक्षक राजा रामास्वामी तात्काळ सक्तीच्या रजेवर--
गृहमंत्री वळसे पाटील यांचे आदेश


बीड_ जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था मागील काही महिन्यात रसातळाला गेली आहे. जिल्ह्यातील सत्ताधारी आमदारांसह विरोधी आमदारांनी पोलीस अधिक्षक राजा रामस्वामी यांच्या विरोधात लक्षवेधी मांडल्यानंतर गृहमंत्र्यांनी बीडचे एसपी राजा रामास्वामी यांना तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवत असल्याचे सांगत १५ दिवसात चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन विधानसभेत दिले. तर अन्य एका प्रकरणात अंबाजोगाई शहर ठाण्याचे पोलीस निरिक्षक बाळासाहेब पवार यांच्यावर निलंबनाची टांगती तलवार आहे.जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. याबाबतच आमदार प्रकाश सोळंके यांनी आज विधानसभेत लक्षवेधी मांडली. यावेळी आमदार सोळंके म्हणाले, बीड जिल्ह्यात आज अवैध धंदे सुरू आहेत. दरोडे, चोऱ्या, मटका, वाळू माफियांचा नंगा नाच  सुरू आहे. त्यात निष्पाप नागरिकांचा बळी जातोय. जिल्हाधिकारी कार्यालयात जो काही गोळीबार झाला त्यात ज्यांच्यावर गोळीबारी झाला त्यांच्यावर गंभीर गुन्हे पोलिसांनी दाखल केले. बीडचा बिहार झाल्याचं वर्तमानपत्रात छापून येतंय. बीडमध्ये गुन्हेगारी वाढतेय त्याला पोलीस अधीक्षक जबाबदार आहे. पोलीस खात्यात ज्या बदल्या झाल्या त्यात मोठा भ्रष्टाचार झाला. दरमहिन्याला हे पोलीस अधीक्षक प्रत्येक पोलीस स्टेशनमधून हफ्ता गोळा करतात. वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत पोलीस अधीक्षकांच्या कारभाराची चौकशी करण्यात यावी. त्यांची तातडीनं बदली करावी अशी मागणी त्यांनी केली.केज विधानसभा मतदार संघाच्या आ. नमिता मुंदडा यांनीही बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था बाबत परखड मत व्यक्त केले. याविषयी बोलतना त्यांनी स्वतःवर बेतलेला अनुभव सभागृहात सांगितले. आ. मुंदडा हे पती आणि मुलीसह रसवंतीवर गेल्या असता काही मद्यधुंद तरुणांनी सोबत फोटो काढण्याचा आग्रह करून धुडगूस घातला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल होऊनही पोलीस अद्याप सर्व आरोपींना अटक करू शकलेले नाहीत. लोकप्रतिनिधी बाबत एवढी गंभीर घटना घडूनही एकदाही पोलीस अधीक्षकांनी मुंदडा यांना कॉल केला नाही. महिला लोकप्रतिनिधी बाबत अशी घटना घडत असेल तर इतर महिलांच्या सुरक्षेचे काय असा सवाल त्यांनी केला. यावर संबंधित पोलीस ठाण्याच्या निरीक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल असे आश्वासन गृहमंत्री वळसे पाटील यांनी दिले. त्यामुळे अंबाजोगाई शहर ठाण्याचे पोलीस निरिक्षक बाळासाहेब पवार यांच्यावर निलंबनाची टांगती तलवार आहे.दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आ. विखे पाटील, आ. आशिष शेलार यांनीही बीडच्या बिघडलेल्या परिस्थितीवर ताशेरे ओढले. संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा