Subscribe Us

header ads

उत्सव शांततेत साजरे करण्याची परंपरा कायम ठेवावी - अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे

बीड स्पीड न्यूज 



डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शांतता समितीची बैठक संपन्न

उत्सव शांततेत साजरे करण्याची परंपरा कायम ठेवावी - अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे

 

बीड, दि. 11 (जि. मा. का.) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शांततामय वातावरणात साजरी करण्यासाठी व कार्यक्रमादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने नियोजन केले असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. जिल्ह्यात होणारे उत्सव शांततेत आणि उत्साहात साजरी करण्याची परंपरा यावर्षीही कायम ठेवावी, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमिवर बीड जिल्हा शांतता समिती बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात ही बैठक झाली. यावेळी पोलीस उपअधीक्षक (गृह) श्रीकांत परोपकारी, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत, पोलीस उपअधीक्षक संतोष  वाळके, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण सचिन मडावी आदि व्यासपीठावर उपस्थित होते.कोरोनापश्चात सण – उत्सव साजरे करण्यासाठी उत्साह असला तरी नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे भान ठेवावे, असे स्पष्ट करून अप्पर जिल्हाधिकारी तुषार 

ठोंबरे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यासाठी उत्सव समित्यांचे पदाधिकारी आणि नागरिकांशी चर्चा करुन प्रशासनाने योग्य नियोजन केले आहे. सर्व संबंधित विभागांना त्यांच्या जबाबदाऱ्या नेमून दिलेल्या असून त्या योग्य रीतीने पार पाडण्यासाठी निर्देश देण्यात आले आहेत. जयंतीच्या मिरवणुकीच्या वेळी कोणत्याही प्रकारची अनुचित घटना न होण्यासाठी समित्यांचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी. आपल्या आसपास काही अनुचित प्रकार आढळून आल्यास तात्काळ पोलीस आणि प्रशासनास अवगत करावे. तसेच, उत्सव कालावधीमध्ये सोशल मीडियाबाबतही अधिक जागरुक रहावे. उत्सव कार्यक्रमादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.  अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी वेळेचे पालन, शहर स्वच्छता, विद्युत पुरवठा, पोलीस बंदोबस्त, वाहतूक नियमन, भेसळयुक्त पदार्थांची विक्री, अवैध दारु विक्री, 

महिला व मुलांच्या सुरक्षेसाठी दामिनी पथकांची नियुक्ती याबाबत केलेल्या नियोजनाची माहिती यावेळी दिली. तसेच, नादुरूस्त सीसीटीव्ही कॅमेरे दोन दिवसात सुव्यवस्थित ठेवावेत, अशी सूचना त्यांनी यावेळी केली. पोलीस उपअधीक्षक संतोष वाळके म्हणाले, जयंती उत्सवाच्या कालावधीत कोणत्याही प्रकारची अप्रिय घटना घडणार नाही, यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर पोलीस अधिकारी यांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. मिरवणुकीच्या वेळी वाहतूक कोंडी न होण्यासाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे, असे सांगून पोलीस विभागामार्फत केलेल्या नियोजनाची माहिती त्यांनी यावेळी दिली व जयंती उत्सव कालावधीत नागरिकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले.यावेळी जिल्ह्यातील जयंती उत्सव समित्यांचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांनी चर्चेत भाग घेऊन उपयुक्त सूचना केल्या. या बैठकीस उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, जयंती उत्सव समित्यांचे अध्यक्ष, पदाधिकारी तसेच अधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा