बीड स्पीड न्यूज
शिक्षण आणि बालपण हा प्रत्येक बालकाचा अधिकार
– जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा
बालकामगारांना कामावर न ठेवण्याचे आवाहन
बीड|प्रतिनिधी-: दि. 10 (जि. मा. का.) : बालकामगार ही एक अनिष्ट प्रथा असुन, ती नष्ट करण्यासाठी शासनाचे सतत प्रयत्न चालू आहेत. बालकामगार प्रथा उच्चाटनासाठी शासनाने अत्यंत कडक कायदेशीर पावले उचलली आहेत. शिक्षण आणि बालपण हा प्रत्येक बालकाचा अधिकार आहे. तो जपा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प बीड राधाबिनोद शर्मा यांनी केले आहे.दिनांक 12 जून हा बालकामगार प्रथा विरोधी दिवस म्हणून पाळल्या जातो. या दिनाच्या पार्श्वभूमिवर त्यांनी जिल्ह्यातील आस्थापनांना हे आवाहन केले आहे.जिल्ह्यातील सर्व हॉटेल चालक, चहाच्या टपऱ्या, विविध प्रकारची दुकाने, गॅरेज, वीटभट्टी खडी केंद्रे, जिनींग प्रेसींग, कत्तल खाने व इतर धोकादायक उद्योगातील मालकांनी आपल्या आस्थापनेत बालकामगार कामावर ठेऊ नयेत. तसेच पालकांनीही थोड्याशा मजुरीच्या लोभापोटी आपल्या बालकांचे आयुष्य होरपळून टाकू नये, असे ते म्हणाले..बालकामगार प्रथा कमी अधिक प्रमाणात अस्तित्वात असून ज्या वयात मुलांनी शिकायचे, खेळायचे, हसायचे त्या वयात मुलांना कामावर जावे लागणे हे अयोग्य आहे. आर्थिक परिस्थितीमुळे अनेक पालक मुलांना कामावर पाठवतात व मालक त्यांना अल्पशा मजुरीवर कामावर ठेवतात. ही बाब निश्चितच भूषणावह नाही.बाल व किशोरवयीन कामगार प्रतिबंध व नियम असुधारीत अधिनयम, 2016 नुसार 14 वर्षाखालील बालकांना कोणत्याही व्यवसाय/प्रक्रियेत कामावर ठेवणे तसेच 14 वर्षे पूर्ण परंतु 18 वर्ष पूर्ण न झालेल्या किशोरवयीन मुलांना धोकादायक उद्योग व प्रक्रियांमध्ये कामावर ठेवणे गुन्हा आहे. जर मालकाने/नियूक्त्याने बाल अथवा किशोरवयीन मुलांना कामावर ठेवल्यास, त्यांना 6 महिने ते दोन वर्षापर्यंत कारावास किंवा 20 हजार रु. ते 50 हजार रुपयापर्यंत दंड किंवा दोन्हीही अशी शिक्षा होऊ शकते. त्यामुळे बाल अथवा किशोरवयीन मुलांना कामावर ठेऊ नये.
0 टिप्पण्या