Subscribe Us

header ads

बाबूने पत्त्यात पाच हजार रुपये जिंकल्याच्या रागातून खून

बीड स्पीड न्यूज 

बाबूने पत्त्यात पाच हजार रुपये जिंकल्याच्या रागातून खून 

तीन सख्ख्या भावांवर गेवराई ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद


गेवराई|प्रतिनिधी-: शहरातील संजय नगर भागात बुधवारी रात्री - बाबू शिवराम शेनुरे (वय २४) या तरुणाचा मारहाण करत सिमेंट रोडवर आपटून खून करण्यात आला. बाबूने पत्त्यात पाच हजार रुपये जिंकल्याच्या रागातून त्याचा खून झाल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी तीन सख्ख्या भावांवर खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला. दरम्यान, फरार आरोपींच्या तत्काळ अटकेची मागणी करत मयताच्या नातेवाईकांनी गेवराई उपजिल्हा रुग्णालयासमोर रस्ता रोको आंदोलन केले. बुधवारी (दि. २०) गेवराईतील संजय नगर भागातील राममामा मंदिरासमोर बोकडाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमानंतर सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास मंदिरासमोर झालेल्या बाबूच्या खुनाने शहरात खळबळ उडाली होती. रात्री उशिरा मयत बाबूचे वडील शिवराम हनुमंत शेनुरे (रा. संजय नगर, गेवराई) यांनी गेवराई पोलिसात फिर्याद दिली. त्यात नमूद केल्यानुसार, मागील महिन्यात बाबूने राममामा मंदिरा समोर पत्ते खेळत असताना व्यंकट पोशन्ना शेनुरे (रा. पाचोड, जि. औरंगाबाद) याचे पाच हजार रुपये जिंकले होते. त्यानंतर व्यंकट शेनुरेची तीन मुले अंबादास, लाला आणि अशोक बुधवारी बोकडाच्या कार्यक्रमासाठी गेवराईत आले होते. सायंकाळी ६ वाजता त्या तिघांनी मंदिरासमोर बसलेल्या शिवरामला तुझा मुलगा बाबूने आमच्या वडिलांचे पाच हजार रुपये जिंकले, आम्हाला त्याला ठार मारायचे आहे असे म्हणत मारहाण केली. तेंव्हा वडिलांचा आरडाओरडा ऐकून बाबू धावत तिथे आले. बाबुला पाहताच त्या तिघांनी शिवरामला सोडले आणि बाबुला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. बाबुला धरून ते सिमेंट रोडवर आपटून आपटून मारू लागले. यावेळी आजूबाजूच्या लोकांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केल्याने त्यांनी गंभीर जखमी झालेल्या बाबुला नळीत फेकून दिले आणि पळून गेले. जखमी बाबुला कुटुंबीयांनी तातडीने रुग्णालयात नेले, परंतु तिथे डॉक्टरांनी तपासून त्याला मयत घोषित केले. सदर फिर्यादीवरून अंबादास व्यंकट शेनुरे, लाला व्यंकट शेनुरे (दोघे रा. पाचोड) आणि अशोक व्यंकट शेनुरे (रा. संजय नगर, गेवराई) या तीन सख्ख्या भावांवर गेवराई ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला.

आरोपींच्या अटकेसाठी नातेवाईकांनी गेवराई उपजिल्हा रुग्णालयासमोर रस्ता रोको आंदोलन केले

दरम्यान, खुनाच्या घटनेनंतर आरोपी फरार झाले आहेत. आरोपींना तत्काळ अटक करावी या मागणीसाठी मयत बाबूची पत्नी, लहान मुलासह इतर नातेवाईकांनी गुरुवारी सकाळी गेवराई उपजिल्हा रुग्णालयासमोर रस्ता रोको आंदोलन केले. आरोपींचा शोधासाठी पथक पाठविण्यात आले असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल असे आश्वासन उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांनी दिल्यानंतर नातेवाईकांनी आंदोलन मागे घेतले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा