Subscribe Us

header ads

ऊसतोड कामगार परिषदेच्या माध्यमातून महिलांच्या प्रश्नांना व्यासपीठ मिळवून देणार : विधानपरिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे

बीड स्पीड न्यूज 


ऊसतोड कामगार परिषदेच्या माध्यमातून महिलांच्या प्रश्नांना व्यासपीठ मिळवून देणार : विधानपरिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे

बीड, दि. 01 : ऊसतोड कामगार महिला परिषदेच्या माध्यमातून ऊसतोड कामगार महिलांच्या प्रश्नांना व्यासपीठ मिळाले असून, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न विधान परिषदेच्या माध्यमातून करणार असल्याची ग्वाही विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज येथे दिली. बीड येथे आज सामाजिक न्याय भवनच्या सभागृहात महिला किसान अधिकार मंचच्या वतीने आयोजित महिला ऊसतोड कामगार परिषदेच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. आपल्या अध्यक्षतेखाली दोन वर्षांपूर्वी शासनाने ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी विशेष समिती स्थापन केली होती. त्या समितीच्या शिफारशी राज्य शासनाने स्वीकारल्या होत्या, असे सांगून उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, या माध्यमातून ऊसतोड मजुरांसाठी निधी राखीव ठेवणे, शासनाने त्यांच्यासाठी उपाययोजना करणे याला चालना मिळाली आहे. ऊसतोड कामगार मजुरांसाठी ओळखपत्र मिळणे हा एक पहिला विजय आहे. याशिवाय आज प्रशासनासोबत घेतलेल्या बैठकीत ऊसतोड मजूर ज्या जिल्ह्यात जातील तिथे त्यांना शिधापत्रिकेवर धान्य मिळण्यासंदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ऊसतोड मजुरांच्या नोंदणीसाठी जिल्हा परिषदेने विकसित केलेल्या ॲपवर एक महिन्याच्या कालावधीत जवळपास सहा हजार कुटुंबाची नोंदणी झाली असल्याचे सांगून उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, या माध्यमातून ऊसतोड मजुरांना आरोग्य सुविधा मिळणे शक्य होणार आहे. याशिवाय, गळीत हंगामामध्ये ऊसतोड मजुरांच्या पाल्यांच्या भोजन, निवास व शिक्षणाची व्यवस्था करण्याबाबतही सूचना दिल्या असल्याचे सांगून त्यांनी ऊसतोड कामगारांच्या कुटुंबातील आठवीनंतरच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा व वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सामाजिक न्याय विभागासोबत बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. ऊसतोडीसाठी गावोगावी भटकंती करण्याऐवजी ऊसतोड कामगार महिलांना गावातच काम उपलब्ध करून देता येईल का, याबाबतही विचार होणे गरजेचे आहे असे त्या म्हणाल्या. ऊसतोड मजुरांच्या प्रश्नांसंदर्भात जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्थापन करण्यात येणाऱ्या समितीमध्ये परिषदेच्या / संघटनेच्या पाच प्रतिनिधींचा समावेश करावा, अशा सूचना केल्या आहेत. दर तीन महिन्यांनी समितीची बैठक घ्यावी. वर्षातून दोन वेळा आपण या समितीच्या बैठकीस ऑनलाईन पद्धतीने सहभागी होणार असल्याचे त्या म्हणाल्या. ऊसतोड महिला मजुरांच्या समस्या सोडवण्यासाठी साखर कारखाना मालक, सहकार विभाग व ऊसतोड कामगारांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेण्याबाबत त्यांनी यावेळी सूचित केले. यावेळी महिला किसान अधिकार मंचाच्या सीमा कुलकर्णी व मनिषा तोकले यांनी मनोगत विचार मांडले. यावेळी ऊसतोड कामगार महिलांनी त्यांच्या समस्या व अनुभव कथन केले. परिषदेत ऊसतोड कामगार महिलांच्या प्रश्नाबाबत ठराव वाचन करण्यात आले. यावेळी रणरागिनी या पुस्तिकेचे प्रकाशन डॉ. नीलमताईंच्या आणि इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महिला किसान अधिकार मंचच्या सीमा कुलकर्णी, महिला ऊसतोड कामगार संघटनेच्या प्रमुख मनिषा तोकले, संगिता चव्हाण, पल्लवी हर्षे, स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी, शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे, शीतल शेठ, स्वाती ढमाले, विद्या होडे, शर्मिला येवले या महिला आघाडीच्या पदाधिकारी, अनिल जगताप, अप्पासाहेब जाधव आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. बीड आणि मराठवाड्यातील विविध भागातून शेकडो महिला कार्यकर्त्या आणि ऊसतोड कामगार महिला उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा