Subscribe Us

header ads

अंबाजोगाई पोलिसांच्या तावडीतून पळून गेलेला आरोपी केज मध्ये अटक

अंबाजोगाई-: पेट्रोल पंपावर दरोडा टाकून फरार झालेला आरोपी तब्बल पाच वर्षानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या बुधवारी दुपारी हाती लागला.एलसीबीने त्याला अंबाजोगाई शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र सायंकाळी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तो पसार झाला होता . या घटनेने खळबळ उडाल्यानंतर पोलिसांनी त्याचा कसून शोध घेत आखिर तो गुरुवारी दुपारी केज मध्ये पकडण्यात अंबाजोगाई केज युसुफ वडगाव ठाण्यातील पोलिसांना यश आले.समाधान भगवान वैरागे (वय २५, रा. जवळबन, ता. केज हा आरोपी सन २०१६ मध्ये अंबाजोगाई शहर ठाणे हद्दीत असलेल्या सेलूअंबा येथील माजी जि.प.कृषी सभापती राजेभाऊ औताडे यांच्या पेट्रोल पंपावर पडलेल्या दरोड्यात सहभागी होता. समाधानचा सहभाग असल्याने त्याच्यावर कलम ३९५, ३९७ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला. तेव्हा पासून तो फरार होता. बीडच्या स्थानिक गुन्हा शाखेचे प्रभारी पोलिस निरिक्षक सतिश वाघ यांनी उपनिरिक्षक संतोष जोंधळे, पो.ह. ठोंबरे, तांदळे, शेख, पवार, दुबाले यांचे पथक त्याच्या मागावर पाठवले होते . या पथकाने बुधवारी दिवसभर समाधान वैरागे याच्यावर पाळत ठेवून शिताफीने त्यास पकडले. त्यानंतर वैद्यकीय तपासणी करुन त्यास संध्याकाळी सहाच्या सुमारास अंबाजोगाई शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. तिथे पोलीस निरिक्षक बाळासाहेब पवार यांनी हे प्रकरण पुढील कार्यवाहीसाठी पीएसआय गोपाळ सूर्यवंशी यांच्याकडे सोपविण्याचे आदेश दिले. सूर्यवंशी कामानिमित्त बाहेर असल्याने ठाणे अमलदार महिला कर्मचाऱ्यांनी समाधानला समोरच्या लाकडी बाकड्यावर बसविले. दरम्यान, सर्व कर्मचारी कामात व्यस्त असल्याची संधी साधून समाधानने ठाण्यातून पलायन केले. थोड्यावेळाने पीएसआय सूर्यवंशी ठाण्यात आले आणि त्यांनी आरोपीबाबत चौकशी केली असता तो कुठेच दिसून आला नाही. अटकेतील आरोपी पळून गेल्यामुळे ठाण्यामध्ये एकच गोंधळ उडाला. याप्रकरणी पो.ना. संगीता हानवते यांच्या फिर्यादीवरून समाधान वैरागेवर गुन्हा नोंदविण्यात आला.

 आरोपीच्या शोधासाठी पुण्यात पाठविला होता पथक

समाधानच्या शोधासाठी पोलिस निरिक्षक पवार यांनी पीएसआय सूर्यवंशी यांचे पथक आरोपीच्या शोधासाठी पाठविले. ठाण्यातून पसार झालेला समाधान थेट घरी  गेला होता. तिथून त्याने रात्री ९ वा. तो इंडिगो कार घेऊन पलायन केले. त्याची बहिण पुण्याला असल्याने तो तिकडेच गेला असावा या संशयावरून पीएसआय सूर्यवंशी यांचे पथक आणि एलसीबीच्या पथकाने पुण्याकडे धाव घेतली.

 खबर्‍याने दिलती पोलिसांना माहिती

दरम्यान, बुधवारी सकाळी सुमारास सहा. फौजदार कांदे यांच्या संपर्कातील खबऱ्याने समाधान केज शहरात असल्याची गुप्त माहिती दिली. त्यानंतर पोलीस निरिक्षक बाळासाहेब पवार यांनी एएसआय कांदे यांच्या मार्फत खबऱ्यास आरोपीचा पाठलाग करण्यास सांगितले आणि कांदे यांच्यासह पोलीस कर्मचारी सोपने, घोळवे, नरहरी नागरगोजे, शेख यांना तातडीने केजकडे पाठवले. तिथे केज आणि युसुफ वडगावचे पोलीस त्यांच्या मदतीला आले. केज शहरात तीन विविध ठिकाणी गेल्यानंतर समाधान बसस्थानक परिसरातील मुख्य रस्त्यावर एका गेरेज समोर असताना त्याचा पाठलाग करणाऱ्या खबऱ्याने पोलिसांना इशारा केला. त्यानंतर पोलिसांनी झडप घालून समाधानच्या मुसक्या आवळल्या. खबऱ्याची चोख कामगिरी, पो.नि. पवार यांचे नियोजन व अंबाजोगाई, केज, युसुफ वडगाव पोलीस व बीड एलसीबीची तत्परता यामुळे समाधान पुन्हा हाती लागला आणि पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दरम्यान पोलिस ठाण्यातून पळून गेला कसा ? यासारखे अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा