Subscribe Us

header ads

ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्यात लवकरच 'शरद शतम' योजना :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांची घोषणा

       'जागतिक ज्येष्ठ नागरिक' दिनानिमित्त 'समृद्ध वृद्धापकाळ' या विषयावर चर्चासत्र संपन्न

मुंबई, दि.१ :  ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी व उपाययोजनांच्या दृष्टीने 'शरद शतम' नावाची योजना प्रस्तावित केली असून राज्यात ही योजना सुरू करण्यापूर्वी तिची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी राज्य स्तरावर एक उच्चस्तरीय समिती नेमली आहे. समितीचा अहवाल प्राप्त होताच ही योजना मंत्रिमंडळ मान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहे.  या योजनेच्या माध्यमातून राज्यातील 65 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्या मोफत करता येणार असल्याची  घोषणा सामाजिक न्याय व विशेष सहाय मंत्री धनंजय मुंडे यांनी केली.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे 'जागतिक ज्येष्ठ नागरिक' दिनानिमित्त आयोजित समृद्ध वृद्धापकाळ या चर्चा सत्राच्या उदघाटन प्रसंगी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे  बोलत होते.आमदार बाळासोहब आजबे, सामाजिक न्याय विभागाचे अपर मुख्य सचिव अरविंद कुमार, समाज कल्याण आयुक्त पुणे डॉ.प्रशांत नारनवरे, हेल्पेज इंडियाचे संचालक प्रकाश बोरगावंकर, मुंबईच्या माजी महापौर सौ.निर्मला सावंत प्रभावळकर, सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे, फेस्कॉमचे उपाध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलतांना श्री.मुंडे म्हणाले की, आजाराचे वेळीच निदान व्हावे व त्यासाठी सर्व आरोग्य तपासण्या वर्षातून किमान एकदा तरी केल्या जाव्यात व त्या मोफत असाव्यात या उद्देशाने  'शरद शतम' ही योजना  खूप महत्वाची आहे. या योजनेची 

कार्यपद्धती,सर्वेक्षण या सर्व बाबींबरोबरच आजाराचे निदान झाल्यास त्यावर उपचार करण्यासाठी आरोग्य विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन कमीत कमी खर्चात उपचार केले जावेत यासाठीचे समन्वयन या सर्व बाबी ठरवून अंतिम ऍक्शन प्लान तयार करण्यासाठी आम्ही आरोग्य सह विविध विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक उच्चस्तरीय समिती नुकतीच गठीत केली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आम्ही या योजनेचा प्रस्ताव मंत्री मंडळासमोर मंजुरीसाठी ठेवणार आहोत. ही सगळी कार्यवाही येत्या काही दिवसातच पूर्ण होणार असल्याचेही मंत्री श्री. मुंडे यांनी यावेळी सांगितले.यावेळी मंत्री श्री.मुंडे म्हणाले, आपण आपल्या आजूबाजूच्या ज्येष्ठ नागरिकांचा देखील आदर केला पाहिजे. त्यांना वेळ देवून आजवर त्यांनी ज्याप्रकारे आपल्याला जशी मायेची ऊब आपल्या लहानपणी दिली तीच ऊब या वृद्धापकाळात आपण त्यांना देण्याची आवश्यकता आहे  आणि आजच्या दिवशी अशी शपथ सर्वांनी घेण्याची गरज आहे. बालपण, तारुण्य, प्रौढत्व आणि म्हातारपण अशा चार अवस्था मनुष्य जीवनात येतात. प्रत्येक अवस्था आपापल्या जागी महत्वाची असते. प्रत्येकाला आपला वृद्धापकाळ आनंदात जावा ही एकमात्र अपेक्षा असते.मागील दोन वर्षात कोविडच्या लॉकडाऊन काळात श्रावण बाळ, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तिवेतन या दोन्ही योजनेतील लाभार्थींना राज्य सरकारने तीन तीन महिन्यांचे मानधन एकत्रित ऍडव्हान्स दिले, असे करणारे महाराष्ट्र एकमेव राज्य आहे.लॉकडाऊन काळात प्रत्येक जिल्ह्याच्या समाज कल्याण कार्यालयात ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग यांसाठी 24 तास कार्यरत मदत कक्ष स्थापन करून हजारो ज्येष्ठ नागरिक, एकटे राहणारे निराधार आदींना विविध प्रकारची मदत व दिलासा देण्यासाठी प्रयत्न केले गेले आहेत. ज्येष्ठ नागरिकांना तात्काळ मदत मिळावी म्हणूनही हेल्पलाईन आहे अशी माहितीही यावेळी बोलताना ना. मुंडे यांनी दिली.

आपल्या उद्घाटन पर भाषणात धनंजय मुंडे यांनी राज्याचे ज्येष्ठ नागरिक धोरण, अनुदानित वृद्धाश्रम, मातोश्री वृद्धाश्रम यांसह सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती व कार्यपद्धती उपस्थितांना अवगत करून दिली.यावेळी हेल्पेज इंडियाचे संचालक प्रकाश बोरगावंकर, फेस्कॉमचे उपाध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे यांनीही मनोगत व्यक्त केले. सामाजिक न्याय विभागाचे अपर मुख्य सचिव अरविंद कुमार यांनी प्रास्ताविक केले.समृद्ध वृद्धापकाळ' या विषयावर  आयोजित चर्चासत्रात हेल्पेज इंडियाचे संचालक प्रकाश बोरगावंकर, मुंबईच्या माजी महापौर सौ.निर्मला सावंत प्रभावळकर, सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे, फेस्कॉमचे उपाध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे यांनी सहभाग घेतला.या चर्चासत्रात ज्येष्ठ नागरिकांसाठीचे कायदे, ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या योजना,ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविण्यात येणारे उपक्रम,ज्येष्ठ नागरिकांनी  संवाद कसा करावा,दोन पिढीतील संवाद या विषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय कदम यांनी केले.            

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा