Subscribe Us

header ads

संपामुळे एस.टी.च्या वाहकावर रस्त्यावर पादत्राणे शिवून पॉलिश करण्याची वेळ !

बीड स्पीड न्यूज 

बीड (प्रतिनिधी) - एस.टी. कर्मचाऱ्यांच्या गेल्या एक महिन्यापेक्षा जास्त काळ सुरू असलेल्या संपामुळे एका वाहकावर रस्त्यावर बसून चप्पल-बूट शिवून पॉलिश करण्याची वेळ आली आहे. हा संप अजून जास्तच चिघळला तर एस.टी. कर्मचाऱ्यांना आपला व आपल्या कुटुंबियांचा प्रपंच चालविण्यासाठी असेच काहीतरी उद्योग करावे लागतील यात दुमत नाही.एस.टी.महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी २८ ऑक्टोबर पासून संपास सुरुवात झालेली आहे. यात बीड जिल्ह्यातील धारूर डेपो मध्ये कर्तव्यावर असलेले वाहक नेटके बाबासाहेब रामकिशन (बॅच नंबर २५३७४) हे सुद्धा सहभागी झाले आहे. त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी आणि दोन मुलांचा प्रपंच आहे. गेल्या एक महिन्यापासून त्यांना एस.टी. महामंडळाकडून वेतन मिळालेले नाही परंतू घरखर्च तर सुरूच आहे. स्वतःसह घरच्यांची आर्थिक अडचणीमुळे उपासमार होऊ नये म्हणून त्यांनी आज दिनांक ७ डिसेंबर मंगळवारपासून शहरातील आडत मार्केट रोड, तकिया मस्जिद समोरील रस्त्यावर बसत त्यांचा पारंपरिक असलेला चप्पल-बूट शिवण्याचा व्यवसाय सुरू केला. ही बाब मुक्त पत्रकार एस. एम.युसूफ़ यांना माहित झाल्यावर त्यांनी वाहक नेटके यांची मुलाखत घेऊन त्यांच्याबद्दल अधिक माहिती मिळविली असता नेटके यांनी सांगितले की, ते मूळचे बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यात असलेल्या चिंचवण या गावचे रहिवासी. सन २००४ साली रत्नागिरी जिल्ह्यातील खेड या तालुक्यात एस.टी. मध्ये भरती निघाल्यानंतर तिथे जाऊन मुलाखत दिली. त्यात त्यांची निवड होऊन ते वाहक पदावर रुजू झाले. नंतर सन २०११ सालापासून बीड जिल्ह्यातील धारूर तालुका डेपोत त्यांची बदली झाली. तेव्हापासून आतापर्यंत ते धारूर डेपोमध्ये कर्तव्यावर आहेत. परंतु गेल्या २८ ऑक्टोबर पासून एस.टी. महामंडळातील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केले. यात ७ नोव्हेंबर पासून धारूर डेपोतील कर्मचारी संपात सहभागी झाले. तेव्हापासून सर्व कर्मचाऱ्यांचे कर्तव्य बंद आहेत. कर्तव्य बंद असल्याने एस.टी. महामंडळाकडून वेतन ही बंद झालेले आहे. परंतु घरचे दररोजचे प्रपंच सुरूच आहेत आणि जगात सगळे ढोंग करता येतात परंतु पैशाचे ढोंग मात्र करता येत नाही. यामुळे आता कर्मचाऱ्यांची आर्थिक अवस्था हळूहळू डबघाईस येत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना आपले प्रपंच चालविण्यासाठी आता इतर मार्ग चोखाळावे लागतील. हाच विचार करून गेल्या एक महिन्यापासून आर्थिक अडचणीमुळे हैराण असलेल्या नेटके या वाहकाने आपला परंपरागत चांभार व्यवसाय करण्याचे मन बनविले आणि शहरातील तकिया मस्जिद समोर आडत मार्केट रोडला आज ७ डिसेंबर पासून सकाळीच येऊन बसले व लोकांचे चप्पल-बूट शिवून पॉलिश करण्याचा त्यांचा व्यवसाय सुरू केला. अशी माहिती वाहक नेटके यांनी मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांच्याशी बोलताना दिली.


संपकऱ्यांचा रोष अंगावर घ्यायचा नाही - वाहक नेटके

मनात इच्छा असूनही कर्मचार्‍यांच्या संपामुळे कर्तव्यावर जाऊ शकत नाही. कारण मी सुद्धा एक कर्मचारीच आहे. जर एस.टी. महामंडळातील अधिकाऱ्यांचे ऐकून संप विरोधात कर्तव्यावर गेलो तर इतर कर्मचाऱ्यांचा रोष आपल्याच कर्मचारी बंधूंवर निघतो. हा रोष आपल्याला अंगावर घ्यायचा नाही. म्हणून आमचा परंपरागत व्यवसाय सुरु केलाय. जेणेकरून आपल्यासह आपले आई-वडील पत्नी आणि मुलांच्या पोटाची खळगी भरता यावी.


शासन व संपकऱ्यांनी मधला मार्ग त्वरित काढण्याची गरज - आय.एम.काजी

शासनाने संपकरी आंदोलनकर्त्यांना कमीत कमी ५० टक्के वेतन द्यावे. जेणेकरून एस.टी. कर्मचाऱ्यांवर व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येणार नाही व कर्मचाऱ्यांनी सुद्धा शासनास सहकार्य करून प्रवाशांची गैरसोय टाळण्याकरिता किमान ५० टक्के कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य बजावावे. असे मत शुभ विवाह अन् निकाह सोशल संस्थेचे अध्यक्ष आय.एम.काजी यांनी व्यक्त करून त्यांनी वाहक नेटके यांना आर्थिक मदतीचे पाकिट दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा