बीड स्पीड न्यूज
एमपीएससी पूर्व परीक्षेसाठी बीड जिल्ह्यात 3460 उमेदवार
बीड, दि, 14 (जि. मा. का.):- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा (पूर्व) परीक्षा-2021दि. 22 व 23 जानेवारी 2022 रोजी बीड जिल्हा केंद्रावर एकूण 11 उपकेंद्रामधून दोन सत्रात घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी एकूण 3460 उमेदवार बसलेले असून, परीक्षेच्या कालावधीत उपकेंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परीक्षा उपकेंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. तसेच परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात फौ.प्र.सं.1973 चे कलम 144 अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आलेला आहे. उमेदवारांना त्यांच्याकडील मोबाईल, पेजर, कॅल्क्युलेटर, इलेक्ट्रीक वस्तु व अभ्यासाचे इतर साहित्य परीक्षा केंद्रावर घेवून जाता येणार नाही.आयोगाने दिलेल्या सूचनेप्रमाणे परीक्षेचे आवश्यक साहित्यच उमेदवारांना जवळ बाळगण्याची मुभा राहील. तसेच सर्व उमेदवारांनी परीक्षेच्या वेळी प्रवेशपत्रासोबतच त्यांचे स्वत:चे आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट किंवा ड्रायव्हींग लायसन्स (फक्त स्मार्ट कार्ड प्रकारचे) यापैकी कोणतेही दोन ओळखपत्र व त्याची एक छायांकित प्रत सोबत आणणे आवश्यक आहे. उमेदवारांना त्यांच्या परीक्षेसाठी परीक्षा उपकेंद्रावर पहिल्या पेपर क्र.1 साठी सकाळी 8.30 वाजेपूर्वी व पेपर क्र. 2 साठी दुपारी 1.30 वाजेपूर्वी उपस्थित रहाणेबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. परीक्षा सुरु झाल्यानंतर परीक्षा केंद्रावर येणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही सबबी खाली प्रवेश दिला जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी, बीड यांनी कळविले आहे.तसेच कोव्हीड-19 विषाणुच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने केंद्र व राज्य शासन तसेच स्थानिक प्राधिकरणाकडून वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या सर्व सूचना, आदेशाचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे, याचीही उमेदवारांनी नोंद घ्यावी.
0 टिप्पण्या