Subscribe Us

header ads

शिवाजीनगर पोलीस ठाणे समोर अनावश्यक बॅरिकेट्सने वाहतुकीस अडथळा; मात्र अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या टमटम ना आश्रयाचा अड्डा !

बीड स्पीड न्यूज 

शिवाजीनगर पोलीस ठाणे समोर अनावश्यक बॅरिकेट्सने वाहतुकीस अडथळा; मात्र अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या टमटम ना आश्रयाचा अड्डा !


बीड (प्रतिनिधी) - शहरातील बार्शी रोडवर असलेल्या शिवाजीनगर पोलीस ठाणे समोरील चौकात आवश्यकता नसताना काही दिवसापूर्वी रस्त्याच्या मधोमध तीन बॅरिकेट्स ठेवण्यात आल्या आहेत. या अनावश्यक बॅरिकेट्स मुळे येथील चौकातली वाहतुक सुरळीत होण्याऐवजी जास्तच विस्कळीत झाली आहे. यामुळे येथे मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला असून अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या टमटम ना मात्र नवीन अड्डा बनविण्यासाठी आश्रय मिळाला आहे. यामुळे येथे मोठे अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. या बाबी लक्षात घेता येथे ठेवण्यात आलेल्या या तिन्ही बॅरिकेट्स हटविण्यात येवून वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी. अशी मागणी मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केली असून याकरिता जिल्हा पोलीस अधीक्षकांसह जिल्हाधिकारी यांना लवकरच निवेदन देणार असल्याचे नमूद केले आहे.याविषयी दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, बीड शहरात जनतेला मुकी गृहीत धरून किंवा गळ्यात रेडू आणि कानात बिडी असल्याचे समजून वेगवेगळ्या विभागाचे स्थानिक प्रशासन मनाला येईल तसे वागत असते. याच दृष्टिकोनातून पोलीस प्रशासनाने शिवाजीनगर पोलीस ठाणे, शिवराज पान सेंटर, केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर महाविद्यालय, दीप हॉस्पिटल मार्गे आसेफ़नगर या कायम वर्दळीच्या चौकात होत असलेली वाहतूक कोंडी सोडविण्याकरिता येथे वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याऐवजी उंटावरून शेळ्या हाकण्यासारखे तीन बॅरिकेट्स रस्त्याच्या मधोमध लावून टाकले. यामुळे येथे वाहतुकीची कोंडी सुटण्याऐवजी अजून जास्त वाढली आहे. केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर महाविद्यालयाकडून येणारी वाहने बॅरिकेट्स टाकण्यापूर्वी सरळ रेषेत दीप हॉस्पिटल मार्गे आसेफ़नगरकडे येत होती, बॅरिकेट्स मुळे आता वाहनांना वाकडी करून मार्गक्रमण करावे लागत आहे. यामुळे शिवाजी पुतळ्या कडून येऊन सरळ पुढे बार्शी रोड कडे जाणाऱ्या, आसेफ़ नगर कडे जाणाऱ्या व केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर महाविद्यालयाकडे जाणाऱ्या वाहनांना मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे येथील चौकात वाहतूक कोंडी वाढली आहे. शिवाय बॅरिकेट्स च्या आश्रयामुळे शिवाजीनगर पोलीस ठाणे कॉर्नर ला अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या टमटम चा नवीन अड्डा अस्तित्वात आला आहे. यामुळेही येथे वाहतुकीची कोंडी वाढली आहे. परंतु येथे अनावश्यक बॅरिकेट्स ठेवणाऱ्या पोलीस प्रशासनाला याचे कुठलेही सोयरसुतक असल्याचे  दिसून येत नाही. यामुळे आता येथील वाहतुकीची कोंडी फोडण्याकरिता चौकात कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी. तसेच येथील अनावश्यक बॅरिकेट्स हटविण्यात याव्यात म्हणून लवकरच जिल्हा पोलीस अधीक्षकांसह  जिल्हाधिकारी साहेबांनाही निवेदन देणार असल्याचे मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा