Subscribe Us

header ads

जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांवर कडक कारवाई जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांचे निर्देश

बीड स्पीड न्यूज 


जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांवर कडक कारवाई  जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांचे निर्देश

 

बीड, दि. 17 (जि. मा. का.)  : वैद्यकीय पात्रता व शिक्षण नसतानाही नागरिकांवर वैद्यकीय उपचार तसेच वैद्यकीय शस्त्रक्रिया करून जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांवर यासाठी नियुक्त पथकांनी कडक कारवाई करावी असे निर्देश जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रगती सभागृहात जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय बोगस डॉक्टर पुनर्विलोकन समितीची बैठक झाली.  या बैठकीस पोलीस उपअधीक्षक श्रीपाद परोपकारी, आरोग्य विभागाचे डॉ. पी. के. पिंगळे, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचे डॉ.बी.आर ढाकणे तसेच अशासकीय सदस्य श्री. शेख सिराज शेख, आय एम ए बीडचे अध्यक्ष डॉ. अनुराग पांगरीकर, बीड ग्राहक पंचायतचे अध्यक्ष श्री. आर. टी. गर्जे उपस्थित होते.जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा म्हणाले, नागरिकांचा वैद्यकीय उपचार करणारे बोगस डॉक्टरांवर कायद्यानुसार कडक कारवाई होणे गरजेचे आहे. यासाठी तालुकास्तरावर तालुका आरोग्य अधिकार्‍यांच्या नेतृत्वामध्ये स्थापन केलेल्या पथकांनी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल प्रत्येक महिन्यात सादर करावा. नगरपरिषदस्तरावर यासाठी वैद्यकीय अधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या पथकांनी कार्यवाही करावी .ते पुढे म्हणाले, जाहिरातींच्या माध्यमातून गरजू रुग्णांना आकर्षित करून कोणतीही वैद्यकीय पात्रता व परवानगी नसलेले डॉक्टर व्यवसाय करत असतील तर त्यांच्यावर प्रतिबंध घातले जावेत. यासाठी पोलीस विभागाने विविध कलमांचा वापर करताना या गुन्ह्याच्या अनुषंगाने जास्तीत जास्त शिक्षा होतील, असे कलम या बोगस डॉक्टरांवर लावली जावीत. तसेच न्यायालयीन प्रकरण दाखल करून कारवाई केली यावी असे जिल्हाधिकारी श्री. शर्मा म्हणाले.बैठकीच्या सुरुवातीला समितीचे सदस्य सचिव तथा पोलीस उपअधीक्षक श्री. परोपकारी यांनी सर्व सदस्यांचे स्वागत केले. तसेच जिल्ह्यात सुरू असलेल्या कार्यवाहीबाबत माहिती दिली. डॉ.पिंगळे व डॉ. बी.आर. ढाकणे यांनी बोगस डॉक्टरांवरील कार्यवाही प्रक्रिया बाबत माहिती दिली. यावेळी झालेल्या चर्चेत डॉ. पांगरीकर, श्री. गर्जे , श्री शेख आदींनी सहभाग घेतला.मागील प्रकरणांवर न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याची माहिती  यावेळी देण्यात  आली.  वैद्यकीय उपचारांदरम्यान ॲलोपॅथी पद्धती व आयुष मधील आयुर्वेद , होमिओपॅथी इत्यादी पद्धतींचा वापर करण्यातील प्रक्रियेची माहिती देण्यात आली. जिल्ह्यातील आत्तापर्यंत झालेल्या कार्यवाहीत जवळपास ५४ बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत . यापैकी १५ प्रकरणांमध्ये निकाल दिला असून २ बोगस डॉक्टरांना शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा