Subscribe Us

header ads

लोकांचा जीव महत्वाचा, अपघात रोखण्यासाठी तत्काळ उपाययोजना करा चौपदरीकरणाचा प्रस्ताव ताबडतोब सादर करा--खा. प्रीतम मुंडे

बीड स्पीड न्यूज 

लोकांचा जीव महत्वाचा, अपघात रोखण्यासाठी तत्काळ उपाययोजना करा चौपदरीकरणाचा प्रस्ताव ताबडतोब सादर करा--खा. प्रीतम मुंडे


अंबाजोगाई | प्रतिनिधी-: बर्दापूर- वाघाळा दरम्यान तत्काळ उपाययोजना करणे महत्वाचे आहे. त्यासाठीच्या परवानग्या घेण्यात वेळ दडवू नका. आवश्यकता भासल्यास नियमाच्या बाहेर जाऊन काम करा, त्याच्या जबाबदारी घेऊन कारवाईला सामोरे जाण्याची मी तयारी ठेवते. परंतु तत्काळ या रस्त्यावर गतीरोधक, वाहतूक सूचनांचे फलक लावा. तसेच, या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने राज्य शासनाकडे तात्काळ प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचना अशा सूचना बीडच्या खा. प्रीतम मुंडे यांनी महामार्गाचे कार्यकारी अभियंता जी. पी. स्वामी यांना केल्या. दरम्यान, खासदारांच्या भेटीनंतर महामार्ग प्रशासन कामाला लागले असून कंत्राटदाराला बोलावून तत्काळ काम सुरु करण्यास सांगण्यात आले आहे.खा. प्रीतम मुंडे यांनी मंगळवारी (दि. ०३) महामार्गाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेत अंबाजोगाई लातूर रोडवर बर्दापूर नजीक असलेल्या अपघातप्रवण क्षेत्राची पाहणी केली. लातूरहून अंबाजोगाईकडे येणारा राष्ट्रीय महामार्ग बर्दापूरपासून पुढे दुपदरी होतो. अचानक अरुंद होणाऱ्या या रस्त्यावर आतपर्यंत ५६ जणांनी अपघातात जीव गमावला आहे. त्यामुळे बर्दापुर फाटा ते अंबाजोगाई चार पदरी रस्त्याची मागणी जनतेमधून होत आहे. एवढे बळी गेल्यानंतरही हे अपघातप्रवण क्षेत्र ओळखून चिन्हित करण्यात आले नसल्याबद्दल त्यांनी अभियंत्यांना खडसावले. अपघात रोखण्यासाठी दोन दिवसांत कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच प्रवाश्यांच्या सुरक्षेसाठी अपघात प्रवण क्षेत्राच्या दोन्ही बाजूनी सूचना फलक व गतिरोधक बसवण्याची सूचना देऊन सर्व प्रक्रिया एका आठवड्यात पूर्ण करण्याची तंबी त्यांनी अधिकाऱ्यांना दिली. दरम्यान, या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी आपण पाठपुरावा करत आहोत, केंद्र सरकार देखील यासाठी सकारात्मक असून संबंधित विभागांनी प्रस्ताव सादर केल्यावर चौपदरीकरणाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावू असे खा. मुंडे म्हणाल्या. यावेळी त्यांच्या सोबत युवा नेते अक्षय मुंदडा, प्रवक्ते राम कुलकर्णी, भाजपचे अंबाजोगाई तालुकाध्यक्ष अच्युत गंगणे, गणेश कराड, कमलाकर कोपले, दिलीप काळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी खा.मुंडेंनी केली गडकरींशी चर्चा

बर्दापुर ते वाघाळा दरम्यानच्या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी पत्रव्यवहार केल्यानंतर खा. प्रितमताई मुंडे यांनी नितीन गडकरी यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला, चौपदरीकरणाचा प्रस्ताव दाखल करा, आवश्यक प्रक्रिया पूर्ण होताच प्रश्न मार्गी लावू व दिल्लीत आल्यावर याविषयी अधिक चर्चा करू असा सकारात्मक प्रतिसाद नितीन गडकरी यांनी खा.प्रितम मुंडे यांना दिला.

प्रतीदिन १० हजार वाहनांची वाहतूक; चौपदरीकरण झाले गरजेचे

महाराष्ट्रातील अनेक मोठ्या शहरांसह तेलंगाना, आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्यात जाण्यासाठी लातूर ते अंबासाखर महामार्गाचा वापर होतो. त्यामुळे या रस्त्यावर प्रचंड रहदारी असून प्रतिदिन १० हजारपेक्षा अधिक वाहने या रस्त्यावरून धावत असल्याची अधिकृत माहिती आहे. चौपदरी महामार्गासाठी दहा हजार वाहनांची प्रतिदिन वाहतूक असावी असे मानक आहे. ही पात्रता पूर्ण होत असून बर्दापूर ते वाघाळा मार्ग अद्याप दुपदरीच आहे. त्यामुळे प्रस्ताव दाखल केल्यास चौपदरीकरणाला तत्काळ मान्यता मिळेल असे तज्ञांचे म्हणणे आहे.

अशा होणार तातडीच्या उपाययोजना


अपघात रोखण्यासाठी बर्दापूर ते वाघाळा दरम्यान महामार्गावर आठ ठिकाणी गतिरोधक टाकण्यात येणार आहेत. चमक असल्याने हे गतिरोधक रात्रीच्या वेळीही वाहनचालकांच्या लक्षात येतील. या मार्गावर अपघातप्रवण क्षेत्र असे सूचित करणारे १६ फलक लावण्यात येतील. दुपदरी रस्त्यावर कमाल वेगमर्यादा ७० किमी प्रतीतास असते. मात्र, या अपघातप्रवण क्षेत्रात ३० किमी प्रतीतास वेगमार्य्यादा निश्चित करण्यात आली असून तसे फलक लावण्यात येणार आहेत. तसेच, वळण, वेगमर्यादा, ओव्हरटेकिंगला प्रतिबंध अशा सुचनांचेही फलक बसविण्यात येणार असल्याची माहिती महामार्गाचे कार्यकारी अभियंता जी. पी. स्वामी यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा