Subscribe Us

header ads

गर्भलिंग निदानप्रकरणी आरोग्य विभागाकडून गेवराई प्रथमवर्ग न्यायालयात खटला दाखल

बीड स्पीड न्यूज 


गर्भलिंग निदानप्रकरणी आरोग्य विभागाकडून गेवराई प्रथमवर्ग न्यायालयात खटला दाखल



बीड |
अवैध गर्भलिंग निदान व गर्भपात प्रकरणात आरोग्य विभागाने शनिवारी गेवराईच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात पीसीपीएनडीटी कायद्यानुसार ६ जणांवर स्वतंत्र खटला दाखल केल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी दिली. दरम्यान, आधीच पिंपळनेर ठाण्यात गुन्हा नोंद असलेल्या आरोपींच्या अडचणीत आणखी वाढ झाली. बकरवाडी (ता. बीड) येथील सीताबाई गाडे यांचा अवैध गर्भपात करताना अतिरक्तस्रावाने मृत्यू झाला होता. या प्रकरणात गर्भलिंग निदान करून गर्भपात केल्याचा संशय आल्याने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. साबळेंनी एसपींची भेट घेत याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची मागणी केली होती. शिवाय, शवविच्छेदन अहवालातही अवैध गर्भपात करताना गर्भाशयाला गंभीर इजा झाल्याने सीताबाईंचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले होते.यानंतर पोलिसांनी मृत सीताबाईंचा पती गणेश गाडे, सासरा सुंदर गाडे, भाऊ नारायण निंबाळकर यांना ताब्यात घेत त्यांच्याकडे चौकशी केली असता अर्धमसला येथे अंगणवाडी सेविका असलेल्या मनीषा सानपकडे त्यांनी गर्भलिंग निदान केल्याचे स्पष्ट झाले होते. तर, लॅबचालक वासुदेव गायकेच्या माध्यमातून परिचारिका सीमा डोंगरेकडून गर्भपात केल्याचे स्पष्ट झाले होते. पोलिसांनी मनीषा सानपकडे केलेल्या चौकशीतून सतीश बाळू सोनवणे हा शिकाऊ डॉक्टर गर्भलिंग निदान करत असल्याचे समोर आले होते. त्यालाही पोलिसांनी नगरहून ताब्यात घेतले होते. तर, जालन्याच्या डॉ. गवारेचीही चौकशी केली होती. याप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. साबळे यांनी पीसीपीएनडीटी कायद्यानुसार स्वतंत्र खटला आरोग्य विभागाकडून दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. गेवराई उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तथा तालुका सामुचित अधिकारी डॉ. महादेव चिंचोले यांना प्राधिकृत केले होते. या प्रकरणात 'लेक लाडकी अभियान' च्या अॅड. वर्षा देशपांडे यांनीही लक्ष घातले आहे. आरोग्य विभागाकडून खटला दाखल करण्यापूर्वी आरोग्य विभाग आणि अॅड. देशपांडे यांनीही चर्चा करून खटला दाखल करण्याची प्रक्रिया बारकाईने केली होती.


जिल्ह्यातला २८ वा गुन्हा, केवळ पाच प्रकरणांतच लागली शिक्षा

पीसीपीएनडीटीनुसार २००५ मध्ये जिल्ह्यात पहिला गुन्हा नोंद झाला. त्यानंतर आतापर्यंत २७ गुन्हे आरोग्य विभागाने नोंद केले. यातील २ प्रकरणे निकाली निघाली. २२ पैकी १७ प्रकरणे निर्दोष सुटली तर ५ प्रकरणांत शिक्षा लागली. अजून ५ प्रकरणे प्रलंबित असून ४ प्रकरणे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात तर १ प्रकरण सत्र न्यायालयात प्रलंबित आहे. शनिवारी दाखल झालेला २८ वा गुन्हा आहे.शिकाऊ डॉक्टर सोनवणे जालना पोलिसांच्या ताब्यात गर्भलिंग निदान प्रकरणात अटक केलेला व सध्या न्यायालयीन कोठडीत असलेला शिकाऊ डॉक्टर सतीश सोनवणेला शनिवारी जालना पोलिसांनी ताब्यात घेतले. जालना येथील गुन्ह्याचा त्याच्या सहभागाबाबत पोलिस चौकशी करणार आहेत. जिल्ह्यात गर्भलिंग निदान प्रकरण समोर आल्यानंतर हे गर्भलिंग निदान औरंगाबाद येथील रहिवासी आणि तामिळनाडू येथे एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेणारा सतीश सोनवणे हा करत असल्याचे समोर आले होते.त्याला अटक करून बीड पोलिसांनी त्याच्याकडून सोनोग्राफी मशीनही जप्त केली होती. दरम्यान, जालन्यातील डॉ. सतीश गवारेचे कनेक्शन यात समोर आले होते. त्याच्याकडेच सोनवणे गर्भलिंग निदान शिकला होता. त्यामुळे सध्या कारागृहात असलेल्या सोनवणेचा जालन्यातील गुन्ह्यात सहभाग आहे का? याची चौकशी करण्यासाठी जालना पोलिसांनी सतीश सोनवणेचा ताबा मागितला होता. शनिवारी जालना पोलिसांनी त्याला बीडहून ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा