Subscribe Us

header ads

जिल्ह्यातील निजामकालीन 389 शाळांचे होणार पुनरुज्जीवन; 37 कोटी रुपये निधी मंजूर - ना. धनंजय मुंडेंची माहिती बीड जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्कारांचे ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते वितरण

शिक्षण सेवाभावातून देणारा प्रत्येक शिक्षक आदर्शच - ना. धनंजय मुंडे

ज्ञानदानाबरोबरच शिक्षकांचे कोविड व्यवस्थापनातील योगदान जिल्हा कधीच विसरणार नाही - ना. मुंडेंनी केले शिक्षकांचे कौतुक

बीड (दि.17) ---- : शिक्षण देणे म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानदान, त्याला केवळ व्यवसाय न समजता मनातून सेवाभाव समजून ज्ञानदान करणारे सर्वच शिक्षक आदर्श आहेत, असे गौरवोद्गार राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहेत. ते बीड जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभात बोलत होते.बीड जिल्ह्यातील माध्यमिक व प्राथमिक अशा 217 शाळांमधील वर्गखोल्या पुनर्बांधणी कामे व 172 शाळांमधील दुरुस्ती कामे अशा एकूण 389 निजाम कालीन शाळांच्या इमारतींच्या पुनरुज्जीवन कामासाठी राज्य शासनाने सुमारे 37 कोटी रुपयांची तरतूद केली असून, याबाबतचा शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आला आहे. या शाळांचे पुनरुज्जीवन करण्याचे काम लवकरच हाती घेणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी या कार्यक्रमात स्पष्ट केले.बीड जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये 5 लाख 71 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, त्या सर्वांना शिक्षण देन्याबरोरबरच सामाजिक जाणिवांची भावना निर्माण करणाऱ्या व आदर्श शिक्षकांचा सन्मान करणे भाग्याचे आहे असेही ना. धनंजय मुंडे पुढे बोलताना म्हणाले.या समारंभात जिल्ह्यातील 11 प्राथमिक, 10 माध्यमिक व एका विशेष शिक्षकाचा सहकुटुंब आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान करण्यात आला. पुष्पगुच्छ, सन्मानपत्र व मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी ना. मुंडे यांच्या सह जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. शिवकन्याताई सिरसाट, आ. संदीप भैय्या क्षीरसागर, आ. संजयभाऊ दौंड, जिल्हा परिषद उपाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे, जिल्हाधिकारी राधाबीनोद शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांसह अधिकारी, पदाधिकारी व सत्कारमूर्ती शिक्षक सहपरिवार उपस्थित होते.

कोविड मधील योगदान जिल्हा विसरणार नाही

बीड जिल्ह्यातील शिक्षकांनी शिक्षणाचे धडे देण्याबरोबरच बीड जिल्हा प्रशासनाच्या बरोबरीने कोविड व्यवस्थापनामध्ये मोलाचे योगदान दिले. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मध्ये सुरुवातीपासून बीड जिल्हा विभागात अव्वल होता, त्याचे संपूर्ण श्रेय जिल्ह्यातील शिक्षकांचे आहे. त्यांचे कोविड व्यवस्थापनातील योगदान बीड जिल्हा कधीच विसरणार नाही, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी शिक्षकांच्या कामाचे कौतुक केले.

हे ठरले आदर्श शिक्षक...

प्राथमिक विभागातून श्रीमती अनिता हरिश्चंद्र, अप्पा झिंजुके, श्रीमती मूनव्वर शेख, तानाजी लासुने, गंगाराम शिंदे, श्रीमती ज्योती शिंदे, ताहेरखान पठाण, अंकुश फड, अशोक पवार श्रीमती मंगल नागरे, हरिदास सोळंके तसेच माध्यमिक विभागातून चंद्रकांत कवडे, सतीश दळवी, पोपट गोसावी, शंकर इंगोले, लहू चव्हाण, महादेव क्षीरसागर, पांडुरंग राठोड, श्रीमती अनिता गर्जे, बबन घायाळ, प्रताप काळे आणि श्रीमती मंगल समुद्रे या विशेष शिक्षिका यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

समाजाचा ईश्वरावर जितका विश्वास तितकाच शिक्षकांवर

विशेषकरून ग्रामीण भागात पालकांचा शिक्षकांवर प्रचंड विश्वास असतो, समाजाचा जितका विश्वास ईश्वरावर आहे अगदी तितकाच विश्वास समाज शिक्षकावर व्यक्त करतो. तो विश्वास जपणे ही आपली जबाबदारी आहे, असेही धनंजय मुंडे म्हणाले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती बजरंग बप्पा सोनवणे यांनी केले, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शिवकन्या ताई सिरसाट यांनीही आपले मनोगत व्यक्त करत पुरस्कार प्राप्त शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा