Subscribe Us

header ads

साहित्य संमेलन म्हणजे उत्सव नसून वैचारिक प्रबोधनाचा जागर- संमेलनाध्यक्ष सुरेश पाटोळे

बीड स्पीड न्यूज 

हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून कम्युनिस्ट पक्षामध्ये काम करणार्‍या प्रत्येक कार्यकर्त्याचा आहे- कॉ. नामदेव चव्हाण


बीड (प्रतिनिधी) दि. १० येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृहात संपन्न झालेल्या दैनिक प्रभास केसरी आयोजित चौथ्या सत्यशोधक अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाची सुरवात कुमारी अफिफा मुजीब पठाणच्या सविधान गीताने झाली.महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून संमेलनाचे उद्घाटन आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालयानेचे प्राचार्य डॉ. एच. जी. विधाते यांच्या शुभहस्ते करण्यात आले. स्वागताध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते जे. टी. साळवे यांनी साहित्य संमेलनाच्या आयोजक सौ अनुप्रिता मोरे यांचे आभार मानत सर्व मान्यवरांचे स्वागत करुन साहित्यसंमेला दिशादर्शकाची भूमिका पार पाडली तर प्रा. डा. रमेश लांडगे यांनी प्रास्ताविकात साहित्य संमेलनाचा उद्देश स्पष्ट केला. उद्घाटकीय भाषण करताना प्राचार्य विधाते म्हणाले की, अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य समृद्ध असून जनसामान्यांना या साहित्यामध्ये महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. यावेळी त्यांनी विद्यार्थी दशेतील आपले अनुभव विषद करत अण्णा भाऊंच्या सर्व साहित्यप्रकाराला स्पर्श केला. विचार मंचावर उपस्थित ज्येष्ठ शिक्षक नेते उत्तम पवार यांनी साहित्य संमेलनाला शुभेच्छा देत अण्णाभाऊंच्या विचारांचा आढावा घेतला. डी पी आय नेते अजिंक्य (भैय्या) चांदणे यांनी सामाजिक ऐक्य महत्वाचे असून हा विषय अण्णाभाऊ यांच्या साहित्यात प्रकर्षाने जाणवतो असे म्हटले. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई विभागीय अध्यक्ष तथा दैनिक समर्थ राज योगचे संपादक वैभव स्वामी यांनी दैनिक वृत्तपत्राच्या माध्यमातून महापुरुषांच्या विचारांचा जागर करण्याच्या विचाराला आणि साहित्य संमेलनाला शुभेच्छा देत भविष्यात पत्रकार संघ मुंबई दैनिक प्रभास केसरी सोबत असेल असा विश्वास देत अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर प्रकाश टाकला. तर सामाजिक कार्यकर्ते अशोक भाऊ तांगडे यांनी अण्णाभाऊ साठे एक तत्त्ववेत्ते या अनुषंगाने सभागृहाला संबोधित केले. पुढे बोलताना ते म्हणाले की, अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यात सामाजिक ऐक्य, सामाजिक समता, बंधुता, प्रेम आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारा विचार अण्णाभाऊंनी बुद्धाची शपथ आणि इतर साहित्यातून मांडलेला आहे. शेवटी संमेलनाध्यक्ष सुरेश पाटोळे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, संमेलनाचे अध्यक्षपद मी पहिल्यांदाच भूषवत आहे. हा मांडवभार दैनिक प्रभास केसरी आणि त्यांच्या टीमने माझ्यावर टाकल्यामुळे मी दबून गेलो आहे.  संमेलनाध्यक्ष होण्याचे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे निकष काय आहेत. हे मलाच नाही तर आपल्या कोणालाही माहित नाहीत. जर तुम्हाला-मला ते ठाऊक असते तर अण्णा भाऊ साठे हे विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व्हायला हवे होते. ते झाले जरी नसले तरी त्यांच्या नावाने साहित्य संमेलनं होतात. त्यातलंच वैचारिक जागर करणारं हे आजचं उल्लेखनीय साहित्य संमेलन. ज्यांच्या नावाने भाषा दिन साजरा होतो त्या साहित्यिकाचा असा जागर झाला नाही. आज हा बहुमान मला जो मिळाला त्याचं श्रेय अण्णा भाऊंकडे जातं. त्यांच्या साहित्याचा उपासक म्हणून मजकडून त्यांच्यांवर  'साहित्यसूर्य अण्णा भाऊ साठे कत्रुत्व आणि व्यक्तिमत्त्व ' हा ग्रंथ लिहिला गेल्याची पोहच म्हणून हा सन्मान मिळालाय, तो नम्रपणे स्वीकारावा लागेल.

आम्ही कलेचे दास |
करु अज्ञानाचा नाश | 
साधू देशाचा विकास | 
हीच मनी आस | 
म्हणणारे अण्णा भाऊ साठे हे द्रष्टे   विचारवंत म्हणून मला भावल्याने त्या अनुषंगाने मी आपल्याशी संवाद करत आहे. या भूतलावर प्रथम सांस्कृतिक क्रांती घडते आणि मग राजकीय, सामाजिक क्रांती घडते. हे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मत आपण सारे जाणतोच. या सांस्कृतिक क्रांतीचे बिगुल अण्णा भाऊ, अमर शेख, गवाणकर, आत्माराम पाटील, अशा शाहीर मंडळींनी फुंकलं. समाजभानातून या कलावंतांनी समाजात असणाऱ्या अज्ञानाचा नाश करायचा प्रयत्न आपल्या कलेच्या माध्यमातून केल्याचं दिसतं. त्यातून देशाचा विकास साधण्याची आशा बाळगणारे कलावंत अण्णा भाऊ साठे हे पंजाब दिल्ली दंग्यामुळे अस्वस्थ होतात आणि त्यावर पोवाडा रचतात. अंमळनेरचे हुतात्मे, बंगालची हाक अशा पोवाडयातून हे समाजभान त्यांनी जपलेले आहे. तेच  भान या संमेलनाच्या आयोजकांनी जपल्याचं जाणवलं म्हणून ते अभिनंदनास पात्र आहेत. संमेलन म्हणजे उत्सव नसून वैचारिकतेतून प्रबोधनाचा जागर, हा मूलमंत्र घेऊन आजवरची तीनही संमलेनं झाल्याचं दिसतं. हे समाजभान जपणं ही संमेलनाची जबाबदारी आहे. हे आयोजकांनी दाखवून दिलं आहे. अपेक्षितांचा उचित सन्मान करण्याचा उचललेला विडा अंभिनंदनीय आहे. म्हणून माझ्या सारख्या २०० किलोमीटर  मराठवाड्याच्या परिघाबाहेर राहणाऱ्या सामान्य लेखकाला हा मान दिल्याबद्दल मी आभारी आहे. राज्यव्यापी संमेलन पदरमोड करून भरवणारी ही संस्था म्हणून दैनिक प्रभास केसरीच्या कौतुकाला शब्द नाहीत. केवळ संमेलनाचा उरूस न करता प्रबोधनाची मेजवानी देत सत्य असत्याचा धांडोळा घेण्यासाठी योजलेलं हे संमेलन अण्णा भाऊ साठेंच्या सत्यशोधकी साहित्याचा वसा आणि वारसा चालवण्याचं आजवर काम करत आहे, याचा आनंद आहे. संविधानिक मूल्य उजागर करण्याचं महत्त्वाचं सूत्र असणारं अण्णा भाऊ साठेंचं लेखन नि तिच समता, बंधुता, एकात्मता या सूत्रांवर बेतलेलं हे संमेलन ही अण्णा भाऊ साठेंच्या कार्याला आदरांजली आहे. एक दिवसीय संमेलनाचं आयोजन ही कसरत करण्यात आयोजक यशस्वी झालेत. माणसाचं भान, जाण, स्वाभिमान हे मूळसूत्र घेऊन अण्णा भाऊ लिहित राहिले. ती सारी मूल्य या संमेलनात आहेत. म्हणून अशा संमेलनाचा आपण भाग झाल्याचा संमेलनाध्यक्षांनी आनंद व्यक्त केला.कवी संमेलन सत्राचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक अनंत कराड यांनी साहित्य संमेलनात महत्वाची भूमिका बजावत सहभागी कवींना प्रोत्साहन दिले. परिवर्तनाच्या वाटा या विषयावर सादर झालेल्या कविताने सभागृह दणाणून गेले. सहभागी कवी मध्ये  नागपूरचे संजय ठोसर, महादेव लांडगे, कवी लाड, प्रा. डॉ. विठ्ठल जाधव, अभिनेते निळू भाऊ सावरगेकर, कवी निर्मळ, चंद्रभान जाधव, कवी दीपक चांदने यांचा सहभाग होता.समारोप सत्रात कॉम्रेड नामदेव चव्हाण यांना तिसऱ्या साहित्य संमेलनाचा अण्णाभाऊ साठे जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यासोबतच यावर्षीचा म्हणजेच चौथ्या सत्यशोधक अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत वानखेडे यांना अण्णाभाऊ साठे जीवन गौरव पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यासह सामाजिक, शैक्षणिक आणि अभिनय क्षेत्रात काम करत अण्णा भाऊंचा विचार जनमानसात रुजवणाऱ्या अण्णाभाऊ प्रेमींना अण्णाभाऊ साठे समाज भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. शेवटी अध्यक्षीय भाषणात समारोप सत्राचे अध्यक्ष कॉम्रेड नामदेव चव्हाण म्हणाले की, अण्णाभाऊ साठे कॉम्रेड विचार जगले आणि त्यांच्या विचाराला कम्युनिस्ट पक्षाने मोठी साथ दिली होती. मी आयुष्यभर केलेल्या कामाची पोचपावती म्हणून संयोजन समितीने हा जीवनगौरव पुरस्कार देऊन माझा नव्हे तर माझ्या कामाचा गौरव केला असे मी मानतो. हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून कम्युनिस्ट पक्षामध्ये काम करणार्‍या प्रत्येक कार्यकर्त्याचा आहे. यासोबतच येणाऱ्या काळात हे साहित्य संमेलन राज्य स्तरावर कसे घेऊन जाता येईल यासाठीही माझे प्रयत्न असतील असा आशावाद व्यक्त केला. या सत्राचे सूत्रसंचालन प्रा रमेश लांडगे यांनी तर उपस्थितांचे आभार प्रा डॉ चंद्रकांत साळवे यांनी मांडले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक