Subscribe Us

header ads

निसर्ग कोपला असला तरीही, कुणाचाही घर-संसार उघड्यावर येऊ देणार नाही - धनंजय मुंडे; परळी तालुक्यातील वाणटाकळी, नागापूर, लाडझरी, नागदरा आदी ठिकाणी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत ना. मुंडेंनी स्थानिकांना दिला धीर


पिकांच्या नुकसानीसोबतच वाहून/खरडून गेलेल्या जमिनींची देखील नुकसान भरपाई मिळेल - ना. धनंजय मुंडे यांनी दिला शब्द

वाण नदीवरील वाहून गेलेले पूल, तुटलेले रस्ते आणि दगड गोट्यांमधून वाट काढत धनंजय मुंडेंचा चौथा पाहणी दौरा

पूरपरिस्थितीत तत्परतेने मदतकार्य केलेल्या प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे ना. मुंडेंनी केले कौतुक

परळी (दि. 03) ---- : गेल्या 15 दिवसात जवळपास 4 वेळा ढगफुटी सदृश अतिवृष्टी झाली, वाण नदी सारख्या नदी काठच्या गावांचे यामुळे शेतीसह, घरे, पशु असे प्रचंड नुकसान झाले. निसर्ग कोपला असला तरीही कुणाचेही घर-संसार उघड्यावर पडू देणार नाही, शासनाच्या माध्यमातून प्रत्येक नुकसानग्रस्त नागरिकाला पुन्हा उभारण्याचे काम केले जाईल; असे वक्तव्य सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे वाण टाकळी येथील ग्रामस्थांशी संवाद साधताना केले आहे.29-30 सप्टेंबर च्या रात्रीतून झालेल्या अतिवृष्टीने अनेकांना रात्र - रात्र अडकून जीव मुठीत धरून बसावे लागले. मागील 25 वर्षांच्या काळात इतका पाऊस कधी झाला नव्हता, वाण नदीने विक्राळ स्वरूप धारण करत एका पात्राचे तीन पात्र केले, पाणी, दगड गोटे शेतांमध्ये शिरले. नुकसान पाहताना शेत कोणते आणि नदी पात्र कोणते असा सवाल मनात येतो आहे. त्यामुळे झालेले नुकसान हे पंचनामे करण्या पलीकडचे आहे, असेही ना. मुंडे शेतकऱ्यांशी संवाद साधताना म्हणाले.ना. मुंडे यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह परळी तालुक्यातील वाण टाकळी, नागापूर, लाडझरी तसेच नागदरा आदी गावांमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी करत स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.

*शेतीसह वाहून/खरडून गेलेल्या जमिनींचीही मिळेल भरपाई*

बीड जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी विशेषकरून नदी काठच्या गावांमध्ये शेतातील पिकांचे 100% नुकसान तर झालेच आहे मात्र जमिनीतील माती अक्षरश: वाहून गेली आहे. त्यामुळे तिथे पंचनामे करण्यासारखे आता काही उरलेच नाही, अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेलच शिवाय पुढच्या हंगामात त्यांना जमिनी कसता याव्यात यासाठीही आम्ही मदत करणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले.

*दगड गोट्यांतून काढली वाट...*

वाण नदीच्या काठावर असलेल्या गावांमध्ये नदीचे पाणी शिरल्याने शेती सह, पूल रस्ते, घरे असे अतोनात नुकसान झाले, ना. धनंजय मुंडे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन कुठे तुटलेल्या पुलाच्या काठावरून, कुठे नदी पात्रात दगड गोट्यांमधून वाट काढत तर कुठे वाहून गेलेल्या रस्त्यातून वाट शोधत शेतकऱ्यांच्या बांधावर जात पाहणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी श्रीमती नम्रता चाटे, तहसीलदार सुरेश शेजुळ, गटविकास अधिकारी श्री केंद्रे, नायब तहसीलदार बाबुराव रुपनर, कृषी अधिकारी श्री सोनवणे, यांसह रा.कॉ. चे तालुकाध्यक्ष लक्ष्मण तात्या पौळ, मार्केट कमिटीचे संचालक सूर्यभान नाना मुंडे, वाणटाकळीचे सरपंच हनुमंत माने, उपसरपंच एकनाथ घाडगे, चेअरमन दिलीप गायके, रामराव जाधव, वाण टाकळी तांड्याचे सरपंच विनायक राठोड, नागापूरचे सरपंच मोहनराव सोळंके, भागवत मुंडे, दौनापूरचे सरपंच बळीराम आघाव, माऊली आघाव, माणिक मुंडे, संतोष मुंडे, प्रवीण सोळंके, बलराज सोळंके यांसह स्थानिक पदाधिकारी, कृषी, विमा कंपनी तसेच रेल्वेचे अधिकारी आदी उपस्थित होते.

*प्रशासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तत्परतेने काम करत अनेकांचे वाचवले प्राण*

29 सप्टेंबर च्या रात्री उशिरा जेव्हा अतिवृष्टीने पूर परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे फोन येत होते तेव्हा सर्व मदत व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना मी स्वतः फोनवरून बोलून सूचना देत होतो. प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही परिस्थितीचे गांभीर्य ओळखत रात्र जागून काढली. पुरात शेतात, झाडावर आसरा घेतलेल्या नागरिकांना तत्परतेने सुरक्षित बाहेर काढले, यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही याचे समाधान आहे आणि त्यामुळे या परिस्थितीत बचाव व मदत कार्य केलेल्या सर्व अधिकारी - कर्मचारी यांचे विशेष कौतुक करतो, अशा शब्दात ना. धनंजय मुंडे यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

*आम्ही तीनदा जिल्ह्यात नुकसानीची पाहणी केली तेव्हा त्या अमेरिकेत होत्या, त्यामुळे त्यांना पुरेशी माहिती नसावी - धनंजय मुंडेंचा नाव न घेता पंकजताईंना टोला*

दरम्यान माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी केलेल्या टिकेवरून पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना, जिल्ह्यात जून पासून आजपर्यंत 11 ते 12 वेळा अतिवृष्टी झाली, मागील 15 ते 20 दिवसात चार वेळा ढगफुटी सदृश अतिवृष्टी झाली या काळात आम्ही तीन वेळा सबंध बीड जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी केली, शेतकऱ्यांना धीर दिला, राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना या परिस्थितीचे गांभीर्य अवगत करून दिले व जिल्ह्यासाठी विशेष आर्थिक पॅकेजची व शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची सरसकट मदत देण्याची मागणी केली आहे. आज चौथ्यांदा आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे अश्रू पुसून त्यांना धीर देण्याचं काम करत आहोत, सोबतच राज्य सरकार म्हणून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याबाबतच्या हालचाली राज्य स्तरावर सुरू आहेत. मात्र या संपूर्ण कालावधीत 'त्या' अमेरिकेत होत्या, दोन दिवस आल्या आणि परत निघून गेल्या त्यामुळे त्यांना वस्तुस्थितीची पुरेशी माहिती नसावी, असा टोला धनंजय मुंडे यांनी पंकजाताई मुंडे यांचे नाव न घेता लगावला आहे.

*गूढ आवाज येणाऱ्या लाडझरी व नागदरा येथे भेट, नागरिकांना न घाबरण्याचे केले आवाहन*

दरम्यान 30 सप्टेंबर पासून परळी तालुक्यातील लाडझरी, नागदरा आदी गावांमध्ये भूगर्भातून गूढ आवाज येत असल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या गावात सायंकाळी 6 च्या सुमारास धनंजय मुंडे यांनी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला.अत्यल्प काळात झालेल्या प्रचंड पावसाने भूगर्भातील भूजल पातळी वाढली असून त्यामुळे हवेची निर्माण झालेली पोकळी एक विशिष्ट आवाज निर्माण करते, असे प्रकार मराठवाड्यात अनेक ठिकाणी झाले असून, त्यामुळे भूकंप किंवा अन्य कोणत्याही आपत्तीची सुतराम शक्यता नाही. नागरिकांनी घाबरण्याची अजिबात गरज नाही, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले. यावेळी भूगर्भ व भूजल तज्ज्ञ श्री. पवार यांनीही याबाबतची तांत्रिक माहिती ग्रामस्थांना सांगितली.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ऍड. गोविंदराव फड, शिवाजी सिरसाट, सूर्यभान नाना मुंडे, विश्वाम्भर फड, राजवर्धन दौंड, रा.कॉ.चे तालुकाध्यक्ष लक्ष्मण तात्या पौळ, लाडझरीचे सरपंच शिरीष नाकाडे, नागदऱ्याचे सरपंच सुनील नागरगोजे, घाटनांदूरचे उपसरपंच बाळासाहेब देशमुख, उपविभागीय अधिकारी श्रीमती नम्रता चाटे, तहसीलदार सुरेश शेजुळ, नायब तहसीलदार बाबुराव रुपनर, कृषी अधिकारी श्री. सोनवणे, महावितरण सहाय्यक अभियंता श्री शेळके, देऊळकर यांसह स्थानिक ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक