बीड स्पीड न्यूज
बीड (प्रतिनिधी) - येथील जिल्हा परिषद माध्यमिक कन्या (उर्दू) शाळेतील शिक्षिका शेख सलमा बेगम अब्दुल रशीद यांना त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल साप्ताहिक द स्कूल एक्सप्रेस ने आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन सन्मानित केले.शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेले मराठवाडा विभागातील एकमेव वृत्तपत्र साप्ताहिक द स्कूल एक्सप्रेस ने रविवार दिनांक 24 ऑक्टोबर रोजी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले. यामध्ये बीड येथील जिल्हा परिषद माध्यमिक कन्या (उर्दू) शाळेतील शिक्षिका शेख सलमा बेगम अब्दुल रशीद यांच्या शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची नोंद घेत त्यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कार वितरण सोहळ्याचे अध्यक्ष निवृत्त मुख्याध्यापक विनायक सालगुडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक आमदार विक्रम काळे होते. प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी विक्रम सारूक, खटोड प्रतिष्ठान चे अध्यक्ष गौतम खटोड, ज्येष्ठ नेते मदनराव चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष शेख शाकेर, पीपल्स एज्युकेशन चे सचिव मुश्ताक अन्सारी, शिक्षक नेते उत्तमराव पवार, गुरुकुल संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्ताजी नलावडे, न.से.शेख मोहम्मद सादेख़, न.से. रंजीत बनसोडे, दंत तज्ञ डॉक्टर शेख आमेर, शेकाप युवा नेते शेख राजू भाई यांची प्रमुख उपस्थिती होती. या पुरस्कार वितरण सोहळ्याचे निमंत्रक द स्कूल एक्सप्रेस वृत्तपत्राचे संपादक शेख एजाज, अविष्कार कोचिंग क्लासेसचे संचालक प्रा. सुनील खंडागळे, युनिक अकॅडमी चे संचालक इंजि. हर्षल केकान, अल् मरकज़ टाइम्स यूट्यूब चैनल चे प्रमुख शेख मुश्ताक़ आणि पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष मुज़्तबा खान सर हे होते. हा पुरस्कार वितरण सोहळा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे पार पडला. विशेष म्हणजे या पुरस्कार वितरण समारंभामध्ये आदर्श शिक्षिका सलमा बेगम यांच्याबाबत दुग्धशर्करा योग जुळून आला. कार्यक्रमात आदर्श शिक्षिका पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांनी लिहिलेल्या *पहेली उडान (स्पर्धा परीक्षा )* या उर्दू माध्यमातील २८० पानांच्या पुस्तकाचे प्रकाशन आ. विक्रम काळे यांच्या हस्ते करण्यात आले. सर्वसामान्यांना हे पुस्तक घेता यावे याकरिता पुस्तकाचे स्वागत मुल्य फक्त १५० रूपये ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञानाचे असे पुस्तक मराठी व इंग्रजी माध्यम वगळता उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी प्रथमच तयार करण्यात आले आहे. याचा लाभ उर्दू भाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी घ्यावा. असे आवाहन पुस्तकाच्या विमोचन प्रसंगी शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी केले.
0 टिप्पण्या