Subscribe Us

header ads

विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीच्या विशेष शैक्षणिक कार्यक्रम व गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

बीड स्पीड न्यूज 


विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीच्या विशेष शैक्षणिक कार्यक्रम व गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

_विद्यार्थी, पालक आणि शिक्षक ही त्रिसूत्री नवीन शैक्षणिक धोरणाच्या केंद्रस्थानी : किरणकुमार गित्ते_

_एका पिढीत आयुष्य बदलण्याची शिक्षणात ताकद : राधाबिनोद शर्मा_

_पारंपरिक व्यावहारिक शिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञान हीच राष्ट्रनिर्मितीची गुरुकिल्ली : डॉ. सागर देशपांडे_

_शारीरिक शिक्षण यशस्वी जीवनाचा अविभाज्य भाग : अजित पवार_

_स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचे असेल तर शालेय शिक्षण गंभीरपणे घ्या : आदित्य जीवने_

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : रविवार दि. ९ ऑक्टोबर रोजी येथील स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे नटराज रंगमंदिर येथे स्व.दिनकरराव गित्ते यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीच्यावतीने विशेष शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रातील विशेष करून भारतीय प्रशासकीय सेवेतील मान्यवरांनी नवीन शैक्षणिक धोरण २०२० या विषयावर मौल्यवान मार्गदर्शन केले. सुपर कॉमप्युटरचे जनक पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांनी ध्वनीचित्रफितीद्वारे नवीन शैक्षणिक धोरण २०२० यावर मार्गदर्शन करत आपला सहभाग नोंदवला. याप्रसंगी त्रिपुरा राज्याचे बांधकाम आणि नगरविकास सचिव किरण गित्ते, बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा सौ.उषा किरण गित्ते, बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, साप्ताहिक जडण - घडणचे संपादक डॉ.सागर देशपांडे, परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य व्यवस्थापक मोहन आव्हाड,आदी मान्यवरांची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती. जवळपास ३२ कोटी विद्यार्थी ११ लाख शाळांतून सुमारे १ कोटी ५ लाख शिक्षकांच्या मार्गदशनाखाली शिक्षण घेणारा भारत जगाला आश्चर्यचकित करतो. तब्बल ३६ वर्षांनी स्वातंत्र्यानंतरचे चौथे शैक्षणिक धोरण लागू झाले आहे. आता आपल्या सर्वांसमोर त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आव्हान आहे. याच गोष्टींचा विचार करून विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा सौ. उषा किरणकुमार गित्ते व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी सौ. उषा गित्ते यांनी संस्थेच्या कार्याचा अहवालही उपस्थितांपुढे मांडला.

_पारंपरिक व्यावहारिक शिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञान हीच राष्ट्रनिर्मितीची गुरुकिल्ली : डॉ. सागर देशपांडे_

महाराष्ट्रात नवीन धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी रघुनाथ माशेलकर यांच्या नेतृत्वात समिती स्थापन झाली आहे. या समीतीचे सदस्य व संपादक डॉ. सागर देशपांडे यांनी पारंपरिक व्यावहारिक शिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञान हीच राष्ट्रनिर्मितीची गुरुकिल्ली आहे असे प्रतिपादन यावेळी केले. शाळेत गेल्याने साक्षर होता येईल पण महात्मा फुलेंप्रमाणे नेशन बिल्डिंग करायची असेल तर संस्कार आवश्यक आहेत असेही ते म्हणाले. अशावेळी पालक आणि शिक्षकांची भूमिका महत्त्वाची ठरते. तसेच प्रशासकीय सेवेप्रमाणे शिक्षण व्यवस्थेत स्पर्धा परीक्षा घेऊन आणि योग्य ते प्रशिक्षण देऊन तरुण पिढीला मुख्याध्यापक पदाच्या संधी उपलब्ध होऊ शकतील अशी व्यवस्था नवीन शैक्षणिक धोरणात असल्याची माहिती आपल्या खुमासदार शैलीत डॉ. देशपांडेंनी दिली.
 
_एका पिढीत आयुष्य बदलण्याची शिक्षणात ताकद : बीड जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा_

सर्वांना यशस्वी सचिन तेंडुलकर दिसतो पण त्यामागे अनेक वर्षांची मेहनत असते. त्यामुळे कष्ट घ्यायची तयारी ठेवा. एका पिढीत आयुष्य बदलण्याची शिक्षणात ताकद आहे असे भाष्य बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी केले. विशेष म्हणजे मूळचे मणिपुरी असले तरी त्यांनी कार्यक्रमात आवर्जून मराठीत बोलण्याचा प्रयत्न केला, या गोष्टीला उपस्थितांनीही चांगलीच दाद दिली.

_शारीरिक शिक्षण यशस्वी जीवनाचा अविभाज्य भाग : अजित पवार_

बीड जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी अजित पवार यांनी आपल्या भाषणात शारीरिक शिक्षणावर भर दिला. यावर्षी राष्ट्रपती पुरस्कार हा महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना मिळाला. त्यातही बीड जिल्ह्यातील दोन शिक्षक असणे हे कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले. सोबतच कुठल्याही सुविधा नसल्या तरी बीडच्या मातीतून अविनाश साबळेसारखे खेळाडू जगभरात नावं कमावतात. त्यामुळे आता नवीन शैक्षणिक धोरणाचा फायदा विद्यार्थ्यांना मिळावा यासाठी जिल्हा परिषदेच्यामार्फत विशेष प्रयत्न करणार असेही मुख्याधिकारी पवारांनी यावेळी सांगितले.

_स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचे असेल तर शालेय शिक्षण गंभीरपणे घ्या : आदित्य जीवने_

स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हायचे असेल तर शालेय शिक्षण गंभीरपणे घ्या तसेच जगभरातील चालू घडामोडी सातत्याने अभ्यासा असे जीवने यावेळी म्हणाले. वृत्तपत्र वाचन यालाही महत्त्व आहे तसेच स्पर्धा परीक्षा देत असताना प्लॅन बी तयार ठेवण्याचे आवाहनही प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी आदित्य जीवने यांनी केले.

_विद्यार्थी, पालक आणि शिक्षक ही त्रिसूत्री नवीन शैक्षणिक धोरणाच्या केंद्रस्थानी : किरणकुमार गित्ते_

विद्यार्थ्यांसोबतच पालकांमध्ये मुलं घडवण्याची जिद्द असायला हवी. पालक विद्यार्थ्यांचे सहप्रवासी आहेत. सर्व शिक्षा अभियानामुळे जवळपास 95 विद्यार्थी शिक्षण घेत असले तरी कालसुसंगत आणि जागतिक दर्जाचे शिक्षण ही काळाची गरज ओळखून सरकारने नवीन शैक्षणिक धोरण २०२० लागू केले आहे. आता एकाच वेळी दोन वेगवेगळ्या शाखांत तसेच महाविद्यालयात विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतात अशीही माहिती त्रिपुरा राज्याचे सार्वजनिक बांधकाम, नगर विकास व पर्यटन सचिव श्री किरणकुमार गित्ते यांनी दिली. आता मुलांचा पाया पक्का करण्यासाठी अंगणवाडीचे तीन वर्षे आणि पहिली - दुसरीची असे एकूण पाच वर्षे निपुण भारत अंतर्गत शिक्षणाचा पाया पक्का केला जाईल. शालेय परिक्षा  विद्यार्थ्याांचं मुल्यमापन करण्यासाठी इयत्ता २,५ व ८ वी ला परिक्षा घेतल्या जातील. १० वी व १२ वी च्या परीक्षांना सेमिस्टर पद्धती लागू केली जाईल. किती वर्षात पदवी पुर्ण करायची ही मुभा विद्यार्थ्यांना देण्यात येईल - १ वर्षात सर्टिफिकेट, २ वर्ष डिप्लोमा, ३ वर्ष डिग्री आणि ४ वर्षात मल्टी डिसिप्लिन डिग्री पुर्ण करता येईल.यावेळी बोलताना श्री. गित्ते यांनी नव्या शैक्षणिक धोरणात इयत्ता सहावी नंतर कौशल्य विकास शिक्षण दिले जाणार आहे . तसेच अकॅडमीक क्रेडिट स्कोर बँक अर्थात वेगवेगळ्या वर्षी वेगवेगळ्या महाविद्यालयात शिक्षण घेता येण्याची संकल्पना अशा अनेक गोष्टींवर मार्गदर्शन केले. बहुराष्ट्रीय कंपन्यांप्रमाणे शिक्षण क्षेत्रात यापुढे परदेशी विद्यापिठांना भारतात महाविद्यालय सुरू करता येतील. यासाठी शिक्षण व्यवस्था लालफितीशाहीतून मुक्त करण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अधिकाधिक स्वायत्त संस्था आणि विद्यापीठ या शैक्षणिक धोरणात अभिप्रेत आहेत. यासाठी शिक्षकांना दरवर्षी अंदाजे ५० तासांचे प्रशिक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचेही यावेळी गित्ते यांनी सांगितले.विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटी च्या अध्यक्षा उषा किरण गित्ते यांनी देशात जे जे चांगले आहे ते परळी परिसरातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. आज व्यासपिठावर चार आयएएस अधिकारी असल्याने परळीकरांसाठी ही पर्वणीच आहे असे त्या म्हणाल्या. दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल व स्टडी सर्कल मुळे होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विकास पाहून खुप समाधान मिळते असे म्हणाल्या. तसेच त्यांनी सर्व आयोजकांचे व उपस्थितांचे आभार मानले. मान्यवरांच्या मार्गदर्शनानंतर परळी परिसरातील सुमारे १२० आदर्श शिक्षक, शिक्षणप्रेमी पालक, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला. हा कार्याक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी परिसरातील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्र संचलन श्री महेश मुंडे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा