Subscribe Us

header ads

लेख : 'अण्णा भाऊ साठे' मूल्य जतन करणारे विश्वव्यापी साहित्यिक

बीड स्पीड न्यूज 


लेख : 'अण्णा भाऊ साठे' मूल्य जतन करणारे विश्वव्यापी साहित्यिक
 

साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांना कुठलीही लेखन पाश्र्वभूमी नसताना, पाठबळ, शिक्षण नसताना वास्तव स्थितीचं शब्दरुपाने आत्मबलावर अलौकिक व दैदीप्यमान कर्तृत्व भाळी ठसलेल्या साहित्य शिरोमणीला मी माझा आदर्श समजतो. ज्या जातीतून अण्णा भाऊ आले त्या जातीतला प्रथम साहित्यिक म्हणून त्यांनी आपला तुरा रोवला. ती पताका तिन्ही लोकी फडकवली. माझ्यातला कलावंत घडत असताना अण्णा भाऊंच्या नावाचा गजर दुमदुमत होता.अण्णा भाऊ साठेंच्या साहित्याचा केलेला पुरवठा माझ्या जडणघडणीला पोषक ठरला. माझ्यातला कलावंत पोसला जोजावला. त्यातून अण्णा भाऊंची विश्वव्यापी दृष्टी,द्रष्टेपण मला आकर्षित करत होतं. खुणावत होतं. मूल्य जतन करणं हा अण्णा भाऊंचा स्थायीभाव मला भावला. त्यांच्या एकूण साहित्यात गवसत गेला. नि अल्पशिक्षित व्यक्ती अद् भूत चमत्कार घडवू शकते ,हे शिकायला मिळालं. ध्येय, जिद्द ,चिकाटी हा चमत्कार घडवून आणू शकते हे पटलं. केवळ मराठी मुलखातच नव्हे तर देशातल्या हिंदी, सिंधी, बंगाली, मल्याळम या भाषात अण्णा भाऊ साठेंचं साहित्य अनुवादित झालं. ते सातासमुद्रापल्याड जर्मन, झेक, इंग्लिश, पोलीश, रशियन भाषेत गेलं नि मराठी मातीचा, संस्कृतीचा दरवळ विदेशातही दरवळला नव्हे विदेशी वाचकही भानासुन्न केला. असे किमयागार अण्णा भाऊ ज्या मूलाधारावर भक्कमपणे उभे ठाकलेत ती सारी मूल्य माझ्या मनात, मस्तकात एक प्रकारची घुसळण करतात. या प्रतिभावंताची प्रतिभा जोखणं कुणा कुणालाच शक्य नाही हे समजलं. अण्णा भाऊ आपल्या मनोगतातून आपल्या लेखनाबद्दल व प्रतिभेसंबंधी असे व्यक्त झालेत. 'रत्ना' या कादंबरीच्या मनोगतात ते लिहितात, 'मित्रहो, मी साचा सोडून साहित्यिक झालो आहे. मी काळ, परिस्थिती नि लेखनाचं इमान राखलं'.  'फकिरा' कादंबरीच्या मनोगतात ते लिहितात, 'जशी प्रतिभेला वास्तवाची गरज भासते, तद्वत कल्पनेलाही जीवनाचे पंख असणे आवश्यक असते. आणि अनुभुतीला सहानुभूतीची जोड नसेल, तर आपण का लिहितो याचा पत्ताच लागत नाही. म्हणून मी लिहिताना सदैव सहानुभूतीनं लिहिण्याचा प्रयत्न करतो. कारण ज्याच्या विषयी मी लिहितो ती माझी माणसं असतात. त्यांची  मूर्वत ठेवूनच मला लिहिणं भाग पडतं. 'अण्णा भाऊंच्या नावापुढे लोकशाहीर ही उपाधी लावली जाते. शाहिरीत आपला ठसीव ठसा उमटवून ते कथा, कादंबरी या साहित्य प्रकाराकडे वळले नि अण्णा भाऊ साठेंच्या म्हणण्यानुसार' मी शाहिरीचा धंदा सोडून लेखनाकडे वळलो. शाहीरी नि ललित लेखन हे भिन्न प्रकार, त्यातही लेखनाच्या आकृतीबंधात न अडकता लिहिणं म्हणजे साचा सोडून लिहितो हे त्यांना म्हणायचे आहे. अनुभुतीला सहानुभूतीची जोड देऊन लिहिणारे साहित्यिक वास्तवतेची कास धरून समाजातील सत्यता मांडतात. हे लिहित असताना अण्णा भाऊ साठेंच्या लेखनाची बलस्थानं जी मला दिसली, गवसली तिचा मूलाधार ज्यात आहे ते अण्णा भाऊंचं लेखनसूत्र आहे असं मला वाटतं. नीती, नैतिकता, सन्मान, आत्मसन्मान, कृतज्ञता, नाती, राष्ट्रभक्ती, विनयशीलता, संवेदनशीलता, समाजभान या दशांवंशाने त्यांचं साहित्य नटलेलं आहे. असं माझं अनुमान आहे. आयुष्याची पुरती पन्नास वर्षही वाट्याला न आलेले अण्णा भाऊ 'अजिंक्य' आहेत. ते वाङमयारुपी! दहा पोवाडे, एक शाहिरीसंग्रह, एक नाटक, एक प्रवासवर्णन, चौदा लोकनाट्य, तीस कादंबऱ्या, एकोणीस कथासंग्रह अशी उत्तुंग ग्रंथसंपदा निर्मीकाच्या प्रतिभेचा अवाका, व्याप्ती, उंची, खोली, रुंदी, याचं मोजमाप करु शकणारं परिमाण साहित्याच्या अभ्यासकला चकवा देतं. त्यांच्या कथा, कादंबऱ्या वाचताना ही सूत्री वाचक अनुभवतो. त्याचे पदर अपसूकच उलगडतात. वानगीदाखल थोडीच मांडणी मी करणार आहे. विविधांगी कथाविष्कार त्यांच्या कथांमधून येतो. 'बरबाद्या कंजारी', 'स्मशानातलं सोनं,' 'सुलतान', 'काडीमोड,' 'उपकाराची फेड,' 'मरीआईचा गाडा,' 'सापळा,' 'डोळे,' 'प्रायश्चित्त,' 'आग,' या कथांचं गारुड आजही वाचकांच्या मनावर साम्राज्य करतंय. आजही या कथा नव्याने आशय संपन्नता सिध्द करतात. त्यातली नीती मूल्य, नैतिकता, स्त्री सन्मान, नाती, आत्मसन्मान, विनयशीलता, संवेदनशीलता, समाजभान जपतात.' डोळे 'कथेत आपल्या डोळ्यांमुळं पापभावनेतून गीताचा चुलत दीर सातत्याने तिच्या घरी येतो नि त्यामुळं तिचा संसार उध्वस्त होतो. म्हणून चिकाची काडी डोळ्यात घालून मूळच उपटून टाकणारी गीता. डोळे घालवून शीलाला लागणारा बट्टा धुवू पाहते. अण्णा भाऊ सारखा नितीमान वाटाड्या स्त्री सन्मान नैतिकतेतून उजागर करतात. त्यांची संवेदनशीलता यात प्रतिबिंबित होते. समाजभानातून, विनयशीलता मांडत नीती मूल्यांची, कृतज्ञतेची पखरण करते. 'स्मशानातलं सोनं' भूकेचा संघर्ष मांडणारी कथा, 'उपकाराची फेड' ही जातीय संघर्षाची वास्तव कथा सामाजिक समतेची मूल्य पेरते. सन्मान व आत्मसन्मानाचा जाज्वल्य पोत यात उलगडला आहे.गावगाड्यातली नात्यांची विण विणली आहे. 'सापळा' ही कथा गावगाड्याचं महत्व अधोरेखित करत सामाजिक सलोखा करवते. संवेदनात्मक मांडणी करत सन्मान, आत्मसन्मानाचा आगडोंब उसळवत कृतज्ञता, समाज वास्तव चितारते. 'काडीमोड', मरीआईचा गाडा'या अंधश्रद्धेवर ओरखडा काढत विज्ञानवादाकडे झेपावतात. आजचं जीवनजगणं यातून दिसतं. घटस्फोटाचं आज माजलेलं स्तोम ही कथा क्षमवते. तर मरीआईचा गाड्यातून करोना महामारीतलं माणूसपण धुंडाळायला लावते. इतका द्रष्टेपणा यात आहे.' प्रायश्चित्त ' ही कथा व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम मांडत नात्याला काळीमा फासला म्हणून प्रायश्चित्त घेऊन नैतिकता जोपासते. 'बरबाद्या कंजारी' भटक्या जमातीत खोलवर रुतलेली नीती, नैतिकता या कथेत आहे. समाजभानाचं  अंधश्रद्धा व रीतीरिवाजाची धिंड काढणारी वास्तव कथा आहे. अण्णा भाऊ साठेंचं साहित्य सर्वार्थाने मानवतेची पूजा बांधणारं आहे. 'वारणेचा वाघ', 'फकिरा,' 'चिखलातील कमळ,' 'वैजयंता,' चित्रा,' 'केवड्याचं कणीस, 'चंदन' ',' माकडीचा माळ' या कादंबऱ्या या साऱ्या मूल्यांना वृंध्दीगत करतात. त्यांचं अवकाश अथांग पसरलेलं आहे. अण्णा भाऊ हे प्रखर देशभक्त होते. त्यांच्या लेखनातून त्यांनी त्या काळातल्या काँग्रेस सरकारला टोकाचा विरोध लोकनाट्यातून केला असला तरी त्यात द्वेष नव्हता तर माणसाच्या जगण्यावर, स्वातंत्र्यावर गंडांतर आणण्याला विरोध होता. सरकारने केलेल्या अतिरेकाची पायमल्ली करणं हे ध्येय होतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत, 'ज्ञानेश्वरी' हा ग्रंथ मला भावतो. कारण त्यात असलेलं वाडःमयीन मूल्य अधिक जोरकस आहे. म्हणून इतर ग्रंथापेक्षा जास्त ती मला भावते. याच्याशी साधर्म्य असलेल्या 'महाराष्ट्राची परंपरा' पोवाड्याच्या या ओळी,  घनघोर महाराष्ट्राची! ज्ञानेश्वरांची! गर्जना झाली!! संस्कृत भाषेची भिंत! करुनी आघात! त्यांनी फोडली!! ती माय मराठी बोली! बाहेर काढीली स्वैर सोडीली! अज्ञान, दीन दलिता!! भागवत गीता! त्यांनी वदविली!! असे साधर्म्य साधणारा प्रतिभावंत होणे नाही. अण्णा भाऊंनी विरोधाला विरोध कधीच केला नाही. त्याचं उदाहरण म्हणजे अण्णा भाऊ रशियात असताना तिथल्या रेडिओवर राष्ट्र संघाच्या सभेत पं. नेहरूंचं भाषण ऐकण्यासाठी आतूरलेले कान देशाच्या पंतप्रधानांप्रती आदरभाव प्रकट करतात. 'तीन भाकरी' कथेतल्या गाडीवानाने बैलांना दिलेली गांधी व इंग्रज ही नावं महात्मा गांधीजींच्या कार्याचा गौरव करणारी आहे. ज्याचा त्याला सन्मान देण्याची उदात्तता वंदनीय आहे. अण्णा भाऊ नमन करताना या उदात्तीकरणाची आणखी परिचिती येईल.


प्रथम माय भूच्या चरणा! तीन रंगी राष्ट्र निशाणा
स्मरोनि गातो मी कवना!! धृ!!
कठीण काळी राष्ट्र नौकांना, मार्ग दाखविला त्यांना
लोका दिली ज्यांनी प्रेरणा!
राष्ट्रभक्त महात्म्यांना! आणि त्यागी हुतात्म्यांना!
देशासाठी देह वेचिला त्या नररत्नांना! कय्यूरच्या चार वीरांना!
भारताच्या प्यार भूषणा! अर्पिले ज्यांनी जीवना
आठवून मनी ही शुभनामे! करुनिया स्तवना!
आशीर्वाद मागतो आम्ही, गावया कवना
सभापती आणि सुजना! कलावंता आणि रसिका
 स्फूर्ती द्यावी हीच प्रार्थना!! असे हे विश्वव्यापी साहित्यिक जनगणास नमन करताना लिहितात,
 विश्वव्यापी जनगणा! तुज करुनी वंदना!
गाता शाहिरी कवना! करु मन रंजना!
चाल तमाशा! नमुना आरंभिला
करु आम्ही सेवा! आशीर्वाद द्यावा आम्हाला!! १!!
जग बदलाची स्वप्न पाहणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या कार्याला अभिवादन करताना अण्णा भाऊ साठे लिहितात,'जग बदल घालूनी घाव! सांगून गेले
मला भीमराव!!
गुलामगिरीच्या या चिखलात
रुतुन बसला का ऐरावत!!
अंग झाडून निघ बाहेरी!
आणि घे बिनीवरती धाव!!
अशी हाक देऊन समाज परिवर्तनाची लाट उसळवण्याचं शब्द साम्यर्थ नक्कीच आढळतं.
'महाराष्ट्राची परंपरा' या पोवाड्यात ते लिहितात,
महात्मा फुले लाभले महाराष्ट्राला
अन्याय निवारुनि न्याय द्याया दलिताला
बा महाराष्ट्रा हो जागा झुगारून निद्रा
महाविदर्भ, गोवा, मराठवाडा सारा
सांधुनी देश हा तीन कोटीचा प्यारा! ने पुढे थोर परंपरा!
प्राणप्रिय महाराष्ट्राची परंपरा जतन करणारे साहित्यिक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पोवाडे रचून आपली विश्वव्यापकता बिंबित करतात.
दलित, श्रमिक, शेतमजूर, कामगार, सावकार, भांडवलदार आणि स्त्री वेदना व व्यथांचं बिगुल फुंकणारे अण्णा भाऊ समतेची , सामाजिक सलोख्याची,संविधानिक मूल्यांची आळवणी करतात. अण्णा भाऊंना अपेक्षित  भारतीय समाज  मुख्य प्रवाहाच्या केंद्रस्थानी आणणे हीच खरी त्यांना मानवंदना असेल.


  लेखक - मुकुंद धुताडमल,बीड
              मो.8805086050,9373761110
(लेखक सध्या अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर पीएच.डी करत आहेत.)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा